आशांचे थकीत मानधन द्या, मगच काम सांगा :नेत्रदिपा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 06:16 PM2020-12-03T18:16:29+5:302020-12-03T18:21:23+5:30
zp, kolahpurnews चार दिवसांत मानधन न दिल्यास सोमवार (दि. ७)पासून जिल्हा परिषदेच्या दारात ठिय्या आंदोलन करू, असा इशारा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनचे जिल्हाध्यक्ष नेत्रदीपा पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : कोरोनाकाळात स्वत:चा जीव धोक्यात घालून आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांनी काम केले. मात्र, राज्य शासनाने जाहीर केलेले वाढीव मानधन अद्याप दिलेले नाही. शासनाने आता आमचा अंत पाहू नये, आधी थकीत मानधन द्या, मगच काम सांगा. अशी मागणी करत चार दिवसांत मानधन न दिल्यास सोमवार (दि. ७)पासून जिल्हा परिषदेच्या दारात ठिय्या आंदोलन करू, असा इशारा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनचे जिल्हाध्यक्ष नेत्रदीपा पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनाच्या काळात सर्व्हेक्षण असो अथवा माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाचे काम असो, प्रत्येक वेळी आशा वर्कर्स यांनी अतिशय चांगले काम केले. या कामासाठी राज्य शासनाने जुलै महिन्यात वाढीव मानधन दिवाळीपूर्वी देण्याची घोषणा केली होती. आशा वर्कर्स यांना तीन हजार तर गट प्रवर्तक १४० रुपये दिले जाणार होते. मात्र दिवाळी होऊन महिना उलटला तरी अद्याप हे मानधन मिळालेले नाही.
आशाची दिवाळी अंधारातच गेली. कष्टाचे पैसे देणार नसाल तर काम करणार नाही. मात्र आम्हाला कार्यमुक्त करण्याची धमकी दिली जाते, हा अन्याय असून कष्टाचे दाम मागितले म्हणून थेट काढून टाकण्याची भाषा योग्य नसल्याचे नेत्रदिपा पाटील यांनी सांगितले.
चार दिवसांत प्रलंबित मानधन दिले नाहीतर सोमवारी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा पाटील यांनी दिला. यावेळी सीटूचे भरमा कांबळे, चंद्रकांत यादव, शिवाजी मगदूम, उज्वला पाटील, ज्योती ताकरे, संगीता पाटील आदी उपस्थित होते.