कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची माहिती १०९८ वर द्या : जिल्हाधिकारी दौलत देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 06:02 PM2021-05-13T18:02:04+5:302021-05-13T18:04:57+5:30
CoronaVirus Kolhapur : कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांची माहिती रुग्णालयांनी तसेच नातेवाईकांनी १०९८ वर द्यावी, कोणालाही स्वत:च्या अधिकारात या बालकांना दत्तक किंवा अन्य कोणाकडे सांभाळ करण्यासाठी देता येणार नाही. बालकल्याण समितीमार्फतच बालकांचा निर्णय घेतला जावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिल्या.
कोल्हापूर : कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांची माहिती रुग्णालयांनी तसेच नातेवाईकांनी १०९८ वर द्यावी, कोणालाही स्वत:च्या अधिकारात या बालकांना दत्तक किंवा अन्य कोणाकडे सांभाळ करण्यासाठी देता येणार नाही. बालकल्याण समितीमार्फतच बालकांचा निर्णय घेतला जावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिल्या.
सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असून, एकाच कुटुंबातील पती, पत्नीचे निधन होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांच्या लहान मुलांच्या वाट्याला अनाथपण येत आहे. या अनाथ झालेल्या मुलांना परस्पर दत्तक देण्यासारखे मेसेजेस व्हायरल होत आहेत. शिवाय त्यांची तस्करी, अवैध कारणांसाठी वापर होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे.
यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्याच अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सुजाता शिंदे, बालसंरक्षण अधिकारी सागर दाते, आशिष पुंडपळ, संजय चौगुले, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे उपस्थित होते. दूरदृष्यप्रणालीद्वारे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव पंकज देशपांडे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले यांनी सहभाग घेतला.
यावेळी शहर व जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये व कोविड सेंटरमध्ये अनाथ झालेल्या बालकांची माहिती १०९८ वर द्या, असे सांगणारे फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला. माहिती देण्याची जबाबदारी रुग्णालयांची, वैद्यकीय अधिकारी व कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची असणार आहे.