कोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा द्या : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:07 AM2018-12-07T11:07:29+5:302018-12-07T11:12:32+5:30
सरकारी सेवेत सामावून घेऊन, चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटनेतर्फे गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे ४५0 कोतवाल सहभागी झाले आहेत.
कोल्हापूर : सरकारी सेवेत सामावून घेऊन, चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटनेतर्फे गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे ४५0 कोतवाल सहभागी झाले आहेत.
राज्याच्या कोतवाल संघटनेतर्फे गुरुवारपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून, जिल्ह्यातील कोतवालांनी कामबंद करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. आपल्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, यासाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोतवाल हे सर्व जिल्ह्यांमध्ये गावपातळीवर इंग्रजांच्या काळापासून आजपर्यंत महसुलाची सर्व कामे करत आहेत.
शासकीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करत आहेत; परंतु शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कोणताही लाभ मिळत नाही; त्यामुळे शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणे शासनाचे सर्व लाभ मिळावेत, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी केली जात आहे; परंतु शासनाने याची दखल घेतलेली नाही.
कोतवाल हे गावपातळीवर तळागाळातील महसूल सेवेत काम करणारे महत्त्वाचे पद असून, त्यांच्याकडून बी. एल. ओ., शिपाई, पहारेकरी, स्वच्छक, लिपिक, आदींची कामे करून घेतली जातात.
आंदोलनात संदीप टिपुगडे, श्रीकांत कोळी, अतुल जगताप, सुनील पाटील, पांडुरंग बरकाळे, संतोष पाटील, बाजीराव कांबळे, नामदेव चौैगले, दीपक शिंदे, पांडुरंग डवरी, महादेव भोसले, उमेश कांबळे, आदी सहभागी झाले आहेत.