नंदवाळच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी जमीन द्या, अन्यथा मोर्चा काढू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:27 AM2021-08-28T04:27:20+5:302021-08-28T04:27:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सडोली (खालसा): नंदवाळ (ता.करवीर) येथील विठ्ठल तीर्थंक्षेत्र विकासासाठी शासनाने जमीन उपलब्ध करून द्यावी, अन्यथा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सडोली (खालसा): नंदवाळ (ता.करवीर) येथील विठ्ठल तीर्थंक्षेत्र विकासासाठी शासनाने जमीन उपलब्ध करून द्यावी, अन्यथा टाळ मुंदंगाच्या गजरात लाखो वारकऱ्यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा विठ्ठल मंदिर विस्तारीकरण, विकास कृती समिती, वारकरी व नंदवाळ ग्रामस्थांनी दिला. नंदवाळ येथे विठ्ठल मंदिर तीर्थक्षेत्र विकासासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वारकरी व ग्रामस्थांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच अस्मिता कांबळे होत्या.
यावेळी मल्हार सेनेचे सरसेनापती बबन रानगे म्हणाले, शासनाने मंदिराला तीर्थंक्षेत्र दर्जा दिला, परंतु भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी जमीन उपलब्ध केली नाही. त्यासाठी वारकऱ्यांची चळवळ उभी करण्याची गरज आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर म्हणाले, हा भाविक भक्ताचा लढा यशस्वी करण्यासाठी लोकचळवळ उभी करा. आंदोलनांचे हत्यार हातात घेतल्याशिवाय शासनाला जाग येणार नाही. हंबीराव पाटील म्हणाले, मंदिराला शासकीय जमीन मिळवण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढू, प्रसंगी न्यायालयात जाऊ.
यावेळी दिगंबर मेडसिंगे, सखाराम चव्हाण, तानाजी निकम, तानाजी कांबळे, सागर पाटील उपस्थित होते.