शेतकऱ्यांना तातडीने कर्जे द्या
By admin | Published: May 24, 2017 12:34 AM2017-05-24T00:34:26+5:302017-05-24T00:34:26+5:30
जिल्हाधिकारी : अग्रणी बँक आढावा बैठकीत आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : शेतकरी हा आपला तारणहार असून, तो अन्नदाता आहे. त्यामुळे शेतकरी कोणत्याही परिस्थितीत अडचणीत येता कामा नये, यासाठी संवेदनशील दृष्टीने सर्व बँकांनी शेतकऱ्यांचे हित सांभाळावे. लाभार्र्थी शेतकऱ्याला सुलभरीत्या कर्ज उपलब्ध करून देणे हे बँकांचे प्रथम कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय अग्रणी बँक आढावा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक महाप्रबंधक पी. एस. पराते, नाबार्ड जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक, जिल्हा मध्यवर्र्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक एस. जी. किणिंगे, बँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक बी. के. आरसेकर, आदी उपस्थित होते.
पीक विमा योजना ही शासनाची महत्त्वाची योजना असून, तिचा विशेषत: नदीकाठच्या शेतकऱ्यांनी वेळेवर विमा हप्ता भरून लाभ घ्यावा. पुरामुळे शेतीपिकाचे होणारे संभाव्य नुकसान भरून काढणे शक्य होईल तसेच जिल्ह्यात पीक कर्ज उद्दिष्टाचा पाठपुरावा करताना जिल्हा मध्यवर्र्ती बँकेने केलेले विशेष प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे जिल्हाधिकारी सुभेदार यांनी सांगितले.
बैठकीमध्ये, रिझर्व्ह बँकेचे सहायक महाप्रबंधक पी. एस. पराते यांनी विविध योजनांचा आढावा घेताना सर्व बँकांनी रिझर्व्ह बँक व अध्यादेशाची अंमलबजावणी करावी अशी सूचना केली. बैठकीस, विविध शासकीय योजनांची उद्दिष्टे व पूर्तता, महिला बचत गटांना कर्ज वितरण, किसान क्रेडिट कार्ड वितरण तसेच पीक विमा योजना आदी विषयांच्या आढावा घेतला. याप्रसंगी सर्व
बँकांचे जिल्हा समन्वयक व सर्व महामंडळांचे जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते.