दिशाभूल करणाऱ्यांना ‘दणका’ द्या

By Admin | Published: March 19, 2015 12:12 AM2015-03-19T00:12:52+5:302015-03-19T00:13:57+5:30

सतेज पाटील : राजाराम कारखान्याच्या निवडणुकीसाठी कसबा बावड्यात मेळावा

Give 'misery' to misleading people | दिशाभूल करणाऱ्यांना ‘दणका’ द्या

दिशाभूल करणाऱ्यांना ‘दणका’ द्या

googlenewsNext

कसबा बावडा : साखर उद्योग अडचणीत असल्याचे प्रत्येक वर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेत एकीकडे तुणतुणे वाजवायचे, तर दुसरीकडे मात्र बेडकीहाळ, नागपूर अशा ठिकाणी खासगी साखर कारखाने उभे करून सभासदांची दिशाभूल करायची. अशा दिशाभूल करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात सर्व सभासद शेतकऱ्यांना निवडणुकीच्या निमित्ताने हातात काठी घेऊन दणका देण्याची संधी आली आहे. त्यांनी ती गमावू नये, असे आवाहन माजी मंत्री सतेज पाटील यांनी केले.
राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेल’च्या मेळाव्यात ते बोलत होते. श्रीराम सोसायटीच्या मंगल कार्यालयात पार पडलेल्या या मेळाव्यास राधानगरी, हातकणंगले, गगनबावडा, करवीर, पन्हाळा, आदी तालुक्यांतून मोठ्या संख्येने सभासद शेतकरी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, सत्ताधारी आघाडीचे नेते कारखान्याचा कारभार पारदर्शी आहे म्हणून सांगतात. मग कारखान्यास आॅडिट वर्ग ‘ब’ कशासाठी? याचा खुलासा करावा. सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या या कारखान्याचा कारभार खरोखरच सभासदाभिमुख आहे का? असा सवाल करत या कारखान्याला कोणतेही पाळीपत्रक नाही. सभासदांचा ऊस उशिरा नेला जातो, असा आरोप केला. गेली १५ वर्षे कारखान्यात असाच मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे सभासदांचा हा कारखाना वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
यावेळी कारखान्याचे माजी चेअमन विश्वास नेजदार म्हणाले की, कारखान्यात महाडिक कंपनीने मनमानी कारभार करून पैसा कमावला आहे. बाहेरील भागातील कमी रिकव्हरीचा ऊस आणून कारखान्याचे नुकसान केले आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, शहाजी पाटील (लाटवडे), राजेंद्र बेनाडे (रुई), विश्वास काटकर (पोहाळे), पंडित लाड (निगवे दुमाला), के. डी. नलवडे (धामोड), उत्तम पाटील (निगवे), महेश चव्हाण (पुलाची शिरोली), गोरे गुरुजी (कसबा तारळे), अ‍ॅड. प्रल्हाद लाड (कसबा बावडा) यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शशिकांत खवरे, बाळासो निकम, पूनम जाधव, दत्तू पाटील, लीला धुमाळ, फक्कडराव मुधाळे, बाबासो चौगले, ऋतुराज पाटील, जयसिंग ठाणेकर यांच्यासह सभासद शेतकरी उपस्थित होते.


‘गोकुळ’मध्ये
जास्तीचा दर देणार
‘गोकुळ’ची निवडणूकही ताकदीनिशी लढवणार आहे. ‘गोकुळ’च्या उत्पादक सभासदांना जास्तीत जास्त दर देण्याचा आपला प्रयत्न राहील, असे आश्वासन यावेळी सतेज पाटील यांनी देताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
चांगल्या दुधात पाणी
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात चांगल्या रिकव्हरीचा ऊस असताना महाडिकांकडून कमी रिकव्हरीचा ऊस बाहेरुन आणला जातो. त्यामुळे सरासरी साखर उतारा कमी येतो. हा प्रकार म्हणजे शुद्ध दुधात भेसळीसाठी पाणी घातल्याचा प्रकार असल्याचे नेजदार म्हणाले.

Web Title: Give 'misery' to misleading people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.