खासगी जागा स्वच्छ करण्याकरिता नोटिसा द्या, आयुक्तांच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 01:20 PM2019-07-03T13:20:54+5:302019-07-03T13:26:17+5:30
खासगी जागेतील स्वच्छता करण्यासंदर्भात तसेच तेथील तणकट काढण्याकरिता संबंधित मिळकतधारकांना नोटीस बजावा; तसेच संबंधित मिळकतधारकाकडून कामाची पूर्तता न झाल्यास महापालिकेमार्फत स्वच्छता करून तिचा खर्च संबंधितांकडून वसूल करावा, असे निर्देश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले.
कोल्हापूर : खासगी जागेतील स्वच्छता करण्यासंदर्भात तसेच तेथील तणकट काढण्याकरिता संबंधित मिळकतधारकांना नोटीस बजावा; तसेच संबंधित मिळकतधारकाकडून कामाची पूर्तता न झाल्यास महापालिकेमार्फत स्वच्छता करून तिचा खर्च संबंधितांकडून वसूल करावा, असे निर्देश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले.
ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात आयुक्त कलशेट्टी यांनी आरोग्य विभागाकडील सर्व विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, सहायक आरोग्य निरीक्षक यांची स्वच्छ भारत अभियान, नालेसफाई, ओ.डी.एफ. प्लस, इत्यादी विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित केलेली होती.
या आढावा बैठकीमध्ये आयुक्त कलशेट्टी यांनी शहरातील पूर परिस्थितीबाबत माहिती घेतली. त्यानंतर सर्व आरोग्य निरीक्षक यांना शहरातील सर्व मुख्य रस्ते स्वच्छ करावेत, कंटेनरसभोवतालचा कचरा तातडीने उठाव करण्यासाठी विशेष पथक तयार करावे, शहरातील सर्व शौचालयांची नियमितपणे स्वच्छता करावी, शौचालयासभोवतालचा परिसराचे सुशोभीकरण करावे, अशा सूचना दिल्या.
शहरातील सर्व तरुण मंडळे, धार्मिक मंडळे, भक्तांना महाप्रसाद अथवा अन्य धार्मिक कार्यांवेळी प्रसाद देण्याकरिता कागदी अथवा प्लास्टिक पत्रावळी, प्लेट, ग्लास, ताट, कप, इत्यादी न वापरता स्टीलच्या प्लेट वापरण्याबाबत आवाहन करण्याच्या सूचना दिल्या.
झोपडपट्टी भागामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याबरोबरच झोपडपट्टी सुशोभीकरण करण्याकरिता नोडल आॅफिसर म्हणून अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता, जल अभियंता, आरोग्याधिकारी, उपशहर अभियंता, मुख्य आरोग्य निरीक्षक, तसेच इतरही वरिष्ठ अधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. आढावा बैठकीस उपायुक्त मंगेश शिंदे, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील उपस्थित होते.