कोल्हापूरच्या विकासासाठी एकवेळ संधी द्या
By Admin | Published: October 24, 2015 01:02 AM2015-10-24T01:02:55+5:302015-10-24T01:08:49+5:30
एकनाथ खडसे : महायुतीची कोपरा सभा; नरेंद्र मोदींचे पारदर्शक कारभाराचे आश्वासन पाळले
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या जनताभिमुख अनेक योजना आपल्यापर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचवायच्या असतील आणि शहराचा विकास साधायचा असेल तर कोल्हापूर महापालिकेत महायुतीस एकवेळ संधी द्या, असे प्रतिपादन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले. रंकाळा टॉवर येथे शुक्रवारी रात्री महायुतीच्या आठ उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. खडसे म्हणाले, केवळ केंद्रात आणि राज्यात सत्ता असून चालत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिकेने कोणत्याही योजनेस हिरवा कंदील अर्थात राबविण्याची तयारी दाखविली तरच केंद्राच्या लोकाभिमुख योजना खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचतात. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना निवडून देऊन कोल्हापूर महापालिकेत एकवेळ संधी द्या. या संधीमध्ये आम्ही गुंठेवारीचा प्रश्न निकालात काढू. अल्पसंख्याक समाजासाठीही अनेक योजना आहेत. त्या राबवून या समाजातील नागरिकांचाही विकास करू. कायमची टोलमुक्ती हवी असेल तर आम्हाला निवडून द्या. एक वर्षापूर्वी पेट्रोल, डिझेलचे दर काय होते आणि आज काय दर आहेत? डाळींचे वाढलेले दरही एक महिन्यात पूर्वीसारखेच करू. काँग्रेसच्या राज्यात प्रत्येक महिन्याला एका मंत्र्याचे घोटाळे उघडकीस येत होते. मात्र, भाजपची सत्ता आल्यानंतर पारदर्शक कारभाराचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यात आम्हीही पाळले आहे. काँग्रेसच्या राजवटीत मुलगा, मुलगी अथवा रक्ताच्या नात्यातील नातेवाइकांना एखादी संपत्ती बक्षीस म्हणून द्यायची असेल तर संपत्तीच्या चार टक्के मुद्रांक शुल्क आकारले जात होता. मात्र, आमची सत्ता आल्यानंतर केवळ २०० रुपयांच्या स्टॅम्पवर संपत्ती वर्ग केली जात आहे. येत्या काही दिवसांत कोल्हापूरच्या विमानतळाचाही प्रश्न निकाली काढू. टोल आणि एलबीटी कोणामुळे लागला, याचाही विचार जनतेने करावा. अर्धकुशल, दहावी नापास, पदवीधरांना केंद्राच्या स्किल योजनेतून १० लाखांचे विनातारण कर्ज देऊन खऱ्या अर्थाने बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही खडसे यांनी दिली. ताराराणी आघाडीचे माजी महापौर सुनील कदम, भाजप जिल्हाध्यक्ष महेश जाधव, आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष व आमदार सुभाष देशमुख, पुंडलिक जाधव यांच्यासह अजित ठाणेकर, हेमंत कांदेकर, रचना मोरे, मीनाक्षी मेस्त्री, वैशाली पाटील, शेखर कुसाळे, प्रियांका इंगवले, अमोल पालोजी हे भाजप-ताराराणी आघाडीचे उमेदवार उपस्थित होते. उद्योग विस्तारासाठी प्रयत्न करणार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, उपनगरातील जनतेसाठी आमची सत्ता आल्यास रुग्णालये, नाट्यगृह, महापालिकेचे विभागीय कार्यालय स्थापन करून जनतेची खऱ्या अर्थाने सोय करू. याशिवाय विमानतळाचा प्रश्नही येत्या दोन महिन्यांत मार्गी लावला जाईल. त्यामुळे देशातील अनेक उद्योजक कोल्हापुरात उद्योग विस्तारासाठी येतील. याकरिता महायुतीच्या ४१ पेक्षा अधिक उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.