फुलेवाडी नाक्यावर ‘देईल’ त्यांच्याकडूनच ‘वसुली’
By admin | Published: June 17, 2014 01:14 AM2014-06-17T01:14:26+5:302014-06-17T01:50:28+5:30
पोलीस बंदोबस्तात टोलवसुली : ‘एमएच ०९’ पासिंगची वाहने सुसाट
कोल्हापूर : फुलेवाडी टोलनाक्यावर वाहनांचा क्रमांक पाहून, कोणत्याही प्रकारची सक्ती न करता, देईल त्यांच्याकडूनच टोलवसुली केली जात होती. कर्मचारीही फारसे आग्रही नसल्याने वाहनधारक टोलवसुलीला न जुमानताच पुढे जात होते.
आज, सोमवारी दुपारी पाच वाजता शहरातील सर्वच टोलनाक्यांवर वसुली सुरू करण्यात आली. फुलेवाडी टोलनाक्यावर कऱ्हाड येथील देसाई ग्रुप आॅफ कंपनीचे कर्मचारी वसुलीसाठी होते. राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनकर मोहिते यांच्यासह मोठ्या पोलीस बंदोबस्तात टोलवसुली सुरू करण्यात आली. ‘एमएच ०९’ या कोल्हापूर पासिंगच्या वाहनांना शक्यतो कर्मचारी हात करीत नव्हते. बाहेरून येणाऱ्या वाहनांकडे मात्र टोलचे पैसे मागत होते; पण बाहेरील सर्वच वाहनधारक थांबत नव्हते. तासाभरात तिथे आमदार चंद्रदीप नरके कार्यकर्त्यांसह दाखल झाले. जे देतील त्यांच्याकडूनच टोल घ्या, अडवाअडवी करू नका, अशा सूचना त्यांनी कर्मचारी व पोलिसांना दिल्या. त्यानंतर ते येणाऱ्या वाहनधारकांना टोल देऊ नका, अशी विनंती करीत होते. त्यांच्यासमवेत कुंभी साखर कारखान्याचे संचालक व जिल्हा परिषद सदस्य विलास पाटील, माजी संचालक मदन पाटील, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)