सन्मानाने जागा द्या, अन्यथा स्वबळावर
By admin | Published: July 27, 2014 12:51 AM2014-07-27T00:51:17+5:302014-07-27T01:09:26+5:30
राजू शेट्टी यांचा शिवसेना-भाजपला इशारा : मोदी लाट कर्नाटक, केरळमध्ये कोठे गेली
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतील यश हे केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळेच मिळाल्याचा कांगावा भाजपची मंडळी करीत आहेत. मग ही लाट कोल्हापूरसह कर्नाटक, केरळमध्ये का दिसली नाही? अशी विचारणा करत सन्मानाने जागा वाटप झाले, तर ठीक अन्यथा ‘स्वाभिमानी’चा झेंडा घेऊन विधानसभा लढवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
करवीर व दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्ता मेळावा आज, शनिवारी कोल्हापुरात झाला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत होते.
शेट्टी म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी महायुतीच्या बाजूने उभा करण्याची किमया ‘स्वाभिमानी’ने केली आहे. लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाचे मोल विधानसभेच्या जागांच्या माध्यमातून मागत आहे. सगळेच यश नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाले असे कोणी भ्रमात राहू नये. यामध्ये आमचे योगदान मोठे आहे. जागांबाबत सगळेच मनासारखे होईल, असे नाही. काही जागा सोडाव्या लागतील. पण सन्मानाने चर्चा व्हायला हवी.
सदाभाऊ खोत म्हणाले, ‘स्वाभिमानी’ने अजून हत्यार खाली ठेवलेले नाही. महायुती ही आमची मजबुरी समजू नये. ताकदीचे उमेदवार ज्यांच्याकडे त्याप्रमाणे जागा वाटपाची भाषा सुरू आहे. ताकद आहे, म्हणून दाऊद व अरुण गवळी यांना उमेदवारी देणार आहात का? आम्हाला मुख्यमंत्री, मंत्री व्हायचे नाही, जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत म्हणून महायुतीत आलो आहे. सत्तेसाठी फरफटत मागे येणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी ‘दक्षिण’ मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.
काटे यांना अनिल मादनाईक यांनी एक लाख, तर विजय पाटील (रुकडी) यांनी ११ हजार १११ रुपयांचा निवडणूक निधी जाहीर केला. अनिल मादनाईक, प्रा. जालंदर पाटील, उल्हास पाटील, जयकुमार कोल्हे, राजेंद्र गड्ड्याण्णावर, श्रीकांत घाटगे, आदी उपस्थित होते.