‘गोकुळ’ची सत्ता द्या, ८५ टक्के परतावा देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:28 AM2021-04-30T04:28:15+5:302021-04-30T04:28:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गोकुळचा सत्तारूढ गट दूध उत्पादकांना उत्पन्नातील ८२ टक्के परतावा देत असल्याचे सांगत आहे. वास्तविक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गोकुळचा सत्तारूढ गट दूध उत्पादकांना उत्पन्नातील ८२ टक्के परतावा देत असल्याचे सांगत आहे. वास्तविक पाहता व्यवस्थापन खर्चात बचत करून देशातील अनेक संघांनी ८५ ते ९२ टक्के इतका परतावा दिलेला आहे. या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला विजयी करून सत्ता द्या; दूध उत्पादकांना ८५ टक्के परतावा देऊ, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली .
रंगनाथन समितीच्या शिफारशीनुसार ऊस उत्पादकांना उत्पन्नातील परतावा देताना ७० : ३० हा फॉर्म्युला वापरला जातो. हा फॉर्म्युला दुधासाठी नाही. दुधासाठी परतावा देताना उत्पादन खर्च वगळता सर्व परतावा दूध उत्पादकांना देणे अपेक्षित आहे. सत्तारूढ गट मात्र ऊसाचा फॉर्म्युला दुधासाठी वापरून आपली पाठ थोपटून घेत आहे. गोकुळचा विचार करता गोकुळला चांगल्या प्रतीच्या दुधाचा पुरवठा होतो. म्हैस दुधाचे प्रमाणही गोकुळकडे जास्त आहे. तसेच दूध संकलनासाठी वाहतूक खर्च तुलनेने कमी आहे. पण सत्तारूढ गटाने केलेल्या गैरकारभारामुळे व्यवस्थापन खर्चात वाढ झाली आहे. दररोज १४ लाख लिटर दूध संकलन होत असताना २० लाख लिटर संकलन गृहित धरून विस्तारीकरण केले आहे. त्याप्रमाणात नोकर भरती, मशिनरी खरेदी केली आहे. याचा अतिरिक्त भार गोकुळवर पडला आहे. कार्यक्षेत्राबाहेरील दूध गोळा करून ते संघाकडे आणल्याने कोट्यवधींचे नुकसान होते. लेखापरीक्षण अहवालानुसार कार्यक्षेत्राबाहेरील दूध संकलनामुळे २०१५-१६ या वर्षात संघाला २४ कोटी ४४ लाख, २०१६-१७ या वर्षात ५० कोटी तर २०१७-१८ या वर्षात ६४ कोटी ७७ लाखांचे नुकसान झाले आहे. या सगळ्याला फाटा देत आदर्श गोठे निर्माण करून दूध उत्पादन वाढ व पारदर्शी कारभाराच्या बळावर उत्पादकाला ८५ टक्के परतावा देऊ, असे मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.