यंत्रमागासाठी १.८० रुपये दराने वीज द्या
By admin | Published: June 23, 2015 11:32 PM2015-06-23T23:32:05+5:302015-06-24T00:53:27+5:30
उद्योगमंत्र्यांकडे मागणी : इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनची मागणी
इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगाची स्वतंत्र वर्गवारी करून १ रुपये ८० पैसे प्रतियुनिट दराने वीज उपलब्ध करून द्यावी. तसेच सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत मिळणारे अनुदान यंत्रमागांसाठी पुन्हा चालू करावे, अशा आशयाच्या मागण्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे येथील इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने केल्या. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लवकर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मंत्री देसाई यांनी दिले.
यंत्रमाग उद्योगाकडील विविध समस्या व त्यावरील उपाय याबाबत मंगळवारी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, संचालक चंद्रकांत पाटील, महंमद रफिक खानापुरे, सुनील निवळे, आदींचे एक शिष्टमंडळ मुंबई येथील मंत्रालयात उद्योगमंत्री देसाई यांना भेटले. यावेळी मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर झालेल्या चर्चेत कोष्टी यांनी उद्योगासह विविध समस्या मांडल्या.
तसेच लघुउद्योगाची मर्यादा पाच कोटी रुपयांपर्यंत वाढल्याने विस्तार करणाऱ्या जुन्या उद्योगांच्या गुंतवणुकीवर बांधकाम क्षेत्र वाढविण्याच्या सवलती मिळाव्यात, यंत्रमाग उद्योगातील कामगारांना जाहीर झालेल्या किमान वेतनाच्या पुनर्रचनेत उत्पादनाशी निगडित वेतन जाहीर करावे, लहान उद्योगांसाठी देण्यात येणारे एक कोटी रुपयांचे विनातारण कर्ज यंत्रमाग उद्योगासाठी सुद्धा देण्याचे आदेश वित्तीय संस्थांना द्यावेत, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)