हैदराबाद चकमकीतील पोलिसांना राष्ट्रपती पदक द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 03:38 PM2019-12-09T15:38:55+5:302019-12-09T15:41:40+5:30
हैदराबाद अत्याचार प्रकरणात एन्काउंटर केलेल्या चारही पोलिसांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. अभिनंदनास पात्र असलेल्या पोलिसांचा राष्ट्रपती पदकाने गौरव करावा, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय गृहखात्याकडे केली आहे.
कोल्हापूर : हैदराबाद अत्याचार प्रकरणात एन्काउंटर केलेल्या चारही पोलिसांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. अभिनंदनास पात्र असलेल्या पोलिसांचा राष्ट्रपती पदकाने गौरव करावा, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय गृहखात्याकडे केली आहे.
माने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की हैदराबाद अत्याचार प्रकरणाने देशाची मान खाली गेली होती. अशा प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत न्याय देण्याचे काम हैदराबाद पोलिसांनी केले आहे. या पोलिसांच्या कृतीवर संशय न घेता सुजाण नागरिक म्हणून त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहण्याची गरज आहे. या पोलीस कुटुंबीयांना गृहखात्याने संरक्षण पुरवावे, अशी मागणीही त्यांनी केली.
अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर तक्रार दाखल करून घेण्यासह कारवाई करतानाही पोलिसांमध्ये हद्दीचा वाद होतो. पोलीस ठाणी ही जनतेला सुरक्षा देण्यासाठी आहेत, त्रासासाठी नाहीत, हे लक्षात घेऊन अशा प्रकारची घटना घडल्यानंतर आधी पीडितांची केस दाखल करून घेऊन नंतर स्वत:हून ज्या त्या हद्दीतील पोलीस ठाण्यात पुढे पाठवावी, अशी मागणी केंद्रीय गृह विभागाकडे केली आहे.