कुंभार समाजाला गणेशोत्सव काळात दिलासा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:28 AM2021-07-07T04:28:28+5:302021-07-07T04:28:28+5:30
कोल्हापूर : महापूर आणि कोरोना या दुहेरी संकटामुळे गेल्या तीन वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या कुंभारबांधवांना मूर्तीच्या उंचीची मर्यादा रद्द ...
कोल्हापूर : महापूर आणि कोरोना या दुहेरी संकटामुळे गेल्या तीन वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या कुंभारबांधवांना मूर्तीच्या उंचीची मर्यादा रद्द करून दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे केली. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
गणेशोत्सव दोन महिन्यांवर आला असता राज्य सरकारने मंडळांच्या मूर्ती ४ तर घरगुती २ फुटांपर्यंत असाव्यात, असे निर्बंध घातले आहेत. कुंभार बांधव जानेवारीतच गणेशमूर्ती तयार करायला सुरुवात करतात. आता त्यांचे ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या शिल्लक गणेशमूर्ती आणि यंदाच्या तयार ५ ते १० फुटांच्या मूर्ती यांचे काय करायचे, झालेल्या नुकसानीची भरपाई कशी मिळणार, कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, असे अनेक प्रश्न आज कुंभार समाजासमोर आहेत. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील मुख्यमंत्र्यांकडे याबाबत लक्ष देण्याची मागणी केली आहे. तरी कुंभार समाजाचे कोरोना काळातील आर्थिक नुकसान टाळण्यासाठी मूर्तींच्या उंचीची मर्यादा रद्द करावी, कुंभार समाजाला आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
---