पाचगावला पुरेसे पाणी देऊ
By admin | Published: December 19, 2015 01:05 AM2015-12-19T01:05:11+5:302015-12-19T01:16:25+5:30
आयुक्त : ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळास दिले आश्वासन
कोल्हापूर : शहरालगत असलेल्या पाचगाव तसेच उपनगर परिसराला पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात देण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणी देतोय, पुढील काळात तीन ते चार दिवस पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी पाचगाव ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाला दिले.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली पाचगाव ग्रामपंचायत सदस्य भिकाजी गाडगीळ, जीतू पाटील, आदित्य शेटके, अर्जुन भिलुगडे, तानाजी बाबर, सुशांत गवळी, हिंदुराव पोवार, शैलेश पुणेकर, विकास नेसरीकर, लिंबाजी निर्मळ, सुजित चव्हाण यांच्यासह शिवसैनिकांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन पाचगाव व उपनगरांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. तसेच एक लेखी निवेदनही त्यांना दिले.
पाचगाव व उपनगरांतील भीषण पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्याकरिता पाचगाव ग्रामपंचायतीच्यावतीने १० लाख खर्चाच्या पाईपलाईन योजनेचा प्रस्ताव तयार केला असून गिरगाव येथील दोन्ही पाणी संस्थांकडून पाणी उपसा करून ते पाणी पाचगावच्या टाकीत सोडायचे व तेथून पाचगाव, उपनगरांना देण्याचे नियोजन आहे. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी स्तरावर प्रलंबित आहे. त्याचा पाठपुरावा महानगरपालिकेमार्फत करण्यात यावा, अशी सूचना यावेळी केली.
पाचगावमधील काही उपनगरांना पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु काही महिन्यांपूर्वी रायगड कॉलनी येथील पाणी व्हॉल्व्ह बंद केल्यामुळे पाणीटंचाई तीव्र झाली आहे. काही लोकप्रतिनिधींनी सूडबुद्धीने अधिकाऱ्यांना धमकावून पाणीपुरवठा करणारे व्हॉल्व्ह बंद केल्याची आमची शंका आहे, असे शिष्टमंडळातील काहीजणांनी आयुक्तांना सांगितले. सध्या पाण्याचे टँकर रायगड कॉलनी परिसरात जास्त फिरतात, ते पुढे पाचगावपर्यंत द्यावेत, अशी सूचना यावेळी करण्यात आली. शिवसेना पाचगाव परिसरातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटेपर्यंत तीव्र लढा उभारेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी मनपा उपायुक्त विजय खोराटे, जलअभियंता मनीष पवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)