..तर दिल्लीला धडक देऊ, जैन बांधवांचा विराट मोर्चाद्वारे केंद्र सरकारला इशारा
By भीमगोंड देसाई | Published: January 3, 2023 12:00 PM2023-01-03T12:00:43+5:302023-01-03T19:26:13+5:30
केंद्र सरकारच्या पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने पारसनाथ पर्वताला अभयारण्य म्हणून घोषित केले आहे
कोल्हापूर : झारखंड येथील श्री सम्मेद शिखरजी पारसनाथ पर्वतराज या धार्मिक स्थळाला केंद्र सरकारने जाहीर केलेला पर्यटनाचा दर्जा मागे घ्यावा, या मागणीसाठी मंगळवारी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील जैन बांधवांचा येथे विराट मोर्चा निघाला. निर्णय मागे घ्यावा, अन्यथा प्रचंड संख्येने दिल्लीला धडक देऊ, असा इशारा मोर्चाद्वारे देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे मागणीचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. मोर्चात ध्वज, मागणीचे फलक, महिलांचा लक्षणीय सहभाग लक्षवेधी ठरला.
कोल्हापूर, सांगली, सातारासह उत्तर कर्नाटकातील बेळगाव, विजापूर येथून जैन बांधव मोर्चात सहभागी होण्यासाठी सकाळी दहापासूनच दसरा चौकात एकत्र येत राहिले. शहरातील सर्व बाजूच्या रस्त्यावरून चारचाकी, दुचाकीने बांधव येत राहिले. दरम्यान, ११ वाजता मोर्चा सुरू झाला. जसजसे जैन बांधव येत राहिले, तसे मोर्चात सहभागी होत राहिले. असे चित्र १२ वाजेपर्यंत राहिले.
हातात जैन धर्माचा ध्वज, आपण सगळे एक होऊया, शिखरजी तीर्थक्षेत्र वाचवूया, जैन धर्म की जान है, शिखर महान है अशा आशयाचे फलक हातात घेतलेले समाजबांधव, शिखरजी बचावच्या डोक्यावर परिधान केलेली टोपी मोर्चात लक्षवेधी ठरली. मोर्चा आईसाहेब पुतळा, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, महाद्वार रोड, पापाची तिकटी, सीपीआर चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. येथे स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी आणि जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीनी यांनी मार्गदर्शन केले. शिष्टमंडळाकडून प्रभारी जिल्हाधिकारी शिंदे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर मोर्चाची सांगता झाली.
मोर्चात जगद्गुरू स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, अभिवन स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, माजी खासदार कलाप्पाण्णा आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिल्लीला धडक देऊ
अनादी काळापासून धार्मिक स्थळ असलेल्या सम्मेद शिखरजीवर पर्यटन सुरू झाले तर पावित्र्य नष्ट होणार आहे. भगवान महावीरांनी अहिंसा, जगा आणि जगू द्या हे तत्त्वज्ञान जगाला दिले. आमच्या तीर्थक्षेत्रासाठी आज जैन समाज रस्त्यावर उतरला आहे. तुम्ही आमच्या हृदयावर घाव घातला आहे, आमच्या संयमाचा बांध फुटू देऊ नका, वेळ पडली तर दिल्लीला धडक देऊ. केंद्र सरकारने शिखरजीला शाश्वत जैन तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी व जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी केंद्र सरकारला दिला.
मोर्चा मार्गाचे रिंगण
महिला, अबालवृद्ध, तरुण, तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा मार्ग रिंगण बनला होता. मोर्चा मार्गावर श्रावक, श्राविकांनी स्वच्छता केली. घराला कुलूप लावून बांधव सहभागी झाल्याने शहर दुपारपर्यंत गर्दीमय बनले होते. मोर्चा मार्ग पावसाळ्यात नदी तुडुंब भरून वाहावी तसा दिसत होता. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध होता. कुठेही गोंधळ, आरडाओरड किंवा घोषणाबाजी नव्हती.
पावित्र्य नष्ट होणार आहे
लक्ष्मीसेन महास्वामीजी म्हणाले, अनेक लोक म्हणताहेत पर्यटनस्थळाचा दर्जा दिला तर बिघडले कुठे, देशाची प्रगती होईल. आमचा प्रगतीला अडथळा नाही. पर्यटनाच्या नावाखाली त्या सिद्धभूमीवर मत्स्यपालन, कुक्कुटपालन, बार, रेस्टॉरंट होणार असून त्यामुळे पावित्र्य नष्ट होणार आहे. गिरनार, पालितानामध्ये सध्या हेच सुरू आहे, अशी अवस्था आम्हाला सम्मेद शिखरजीची होऊ द्यायची नाही.