तावडेला कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात द्या

By admin | Published: June 21, 2016 01:13 AM2016-06-21T01:13:00+5:302016-06-21T01:16:20+5:30

न्यायालयाचे आदेश : सनातन संस्थेची ११९ बँक खाती; मलगौंडा पाटील, विनय पवार यांना बँक खात्यात स्वाक्षरीचे अधिकार; सीबीआयची माहिती

Give Talwade to Kolhapur Police | तावडेला कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात द्या

तावडेला कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात द्या

Next

पुणे/कोल्हापूर : सनातन संस्थेची ११९ बँक खाती असून, त्यातील काही बँकेच्या खात्यात स्वाक्षरीचे अधिकार मलगौंडा पाटील आणि विनय पवार यांना होते़ त्यांनी फरार असताना त्याचा वापर केला आहे का, याचा तपास सीबीआय करणार असून, तशी माहिती सोमवारी न्यायालयात देण्यात आली.
दरम्यान, ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी हिंदू जनजागरण समितीचा डॉ. वीरेंद्र तावडे याचा ताबा घेण्याची परवानगी पुणे न्यायालयाने सोमवारी कोल्हापूर पोलिसांना दिली.
सनातनचा पैसा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात


वापरण्यात आला आहे का, तसेच वीरेंद्र तावडे हा १६९ जणांच्या संपर्कात होता़ त्याने आपल्या दुचाकीचे तपशील रविवारी दिले असून, त्याने पुण्यातील ज्या साधकाकडे ही गाडी ठेवली आहे, त्याला ताब्यात घेत असल्याचे सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात सांगून तावडेची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली़ मात्र, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही़ बी़ गुळवे पाटील यांनी सीबीआयची मागणी फेटाळून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़
तावडे याची सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला पुण्यातील जिल्हा न्यायालयात दुपारी हजर केले़ पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तावडेला चौकशीसाठी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात द्यावे, असा कोल्हापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश पोलिसांनी पुण्यातील न्यायालयात सादर केला़ त्याला गुळवे पाटील यांनी मान्यता दिली़
सीबीआयचे वकील राजू यांनी सांगितले की, सनातन संस्थेची ११९ बँक खाती असून, काही खात्यांचे व्यवहार करण्याचे अधिकार मलगौडा पाटील, रुद्र पाटील, विनय पवार यांना होते़ हे अधिकार वेळोवेळी बदलत गेले़ सारंग अकोलकर, विनय पवार हे फरारी असतानाही या बँक खात्याचा वापर करीत होता का? याचा तपास करायचा आहे़ फरार असलेल्या सनातनच्या साधकाकडून १६९ मोबाईल क्रमांकांवर संपर्क ठेवला गेला असल्याची माहिती मिळाली असून, ते कोणाचे आहेत, याचा तपास करायचा आहे़ (प्रतिनिधी)

पुण्यातील आणखी एक साधक ‘रडार’वर
तावडे हा सहकार्य करीत नसून त्याने आपली दुचाकी पुण्यातील ज्या साधकाला दिली आहे़, त्याची माहिती त्याने रविवारी दिली़ या दुचाकीचा वापर डॉ़ दाभोलकर यांच्या हत्येच्या वेळी केल्याचा संशय आहे़ या साधकाला आज ताब्यात घेऊन चौकशी केली जाणार आहे.

गेली २ वर्षे १० महिने हा तपास सुरू असून त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही़ जयंत आठवले यांनी लिहिलेल्या पुस्तकावर बंदी नसून, ते भगवतगीतेवर आधारित आहे़ त्यांना आरोपीची नाही तर सनातन संस्थेची चौकशी करायची आहे़ यापूर्वी सीबीआयला चौकशी करण्याबाबत ९ पत्रे लिहिली आहेत़ त्याचे त्यांनी काहीही उत्तर दिलेले नाही़, असा युक्तीवाद तावडेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केला.

तावडेचा राहणार पोलिस मुख्यालयातच मुक्काम

कोल्हापूर : दाभोलकर हत्याप्रकरणात अटकेत असलेला डॉ. वीरेंद्र तावडे याला कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश पुण्यातील न्यायालयाने दिल्यानंतर कोल्हापुरात त्याची चौकशी कोठे करायची याचे नियोजन कोल्हापूर पोलिसांनी केले आहे.
संशयित समीर गायकवाड याच्याकडे पोलिसांनी मुख्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सात नंबरच्या कक्षात चौकशी केली होती. त्याच कक्षामध्ये त्याचा चौदा दिवस मुक्काम होता. या कक्षामध्ये डॉ. तावडेला ठेवून दिवस-रात्र त्याची चौकशी केली जाणार आहे. तावडेविरोधात सबळ पुरावे गोळा करून ते न्यायालयात सादर केले जाणार आहेत. जेणेकरून त्याच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ मिळू शकेल. यासाठी पोलिसांची एक विशेष यंत्रणा काम करीत आहे.
पोलिसांमध्ये अस्वस्थता
पानसरे यांच्या हत्येनंतर साक्षीदार संजय साडविलकर याने तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, तत्कालीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंकित गोयल, तत्कालीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. चैतन्या, पोलिस निरीक्षक अमृत देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, श्रीकांत मोहिते (एटीएस अधिकारी), कॉन्स्टेबल विजय पाटील यांची भेट घेऊन वीरेंद्र तावडे याचा या हत्येमध्ये संशय असल्याची माहिती दिली होती; परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे ‘सीबीआय’च्या अधिकाऱ्यांना सांगितले. साक्षीदाराने केलेल्या आरोपांमुळे कोल्हापूर पोलिसांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
साडविलकर, तावडे यांची होणार चौकशी
डॉ. दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ‘सीबीआय’ला माहिती देणारा कोल्हापूरचा कट्टर हिंदुत्ववादी साक्षीदार संजय साडविलकर याला पोलिसांनी बंदोबस्त पुरविला आहे. डॉ. तावडे व साडविलकर यांना समोरासमोर घेऊन चौकशी केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


तावडेकडे सापडले आक्षेपार्ह साहित्य !

सनातनचे संस्थापक जयंत आठवले यांनी लिहिलेल्या ‘क्षात्रधर्म साधना’ या पुस्तकातील ११ व्या अध्यायात दृष्ट प्रवृतींचा नाश आध्यामिक शक्तीद्वारे करण्याचे लिहिले आहे़
याशिवाय त्यांनी लिहिलेल्या ‘स्पिरिच्युआलिटी’ या पुस्तकात डॉ़ नरेंद्र दाभोलकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि कॉ. पानसरे यांचा उल्लेख असलेले साहित्य तावडे याच्याकडे सापडले आहे़


कोल्हापूर पोलिस घेणार दोन दिवसांत ताबा
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी हिंदू जनजागरण समितीचा डॉ. वीरेंद्र तावडे याचा ताबा घेण्यासंबंधी ‘एसआयटी’ व कोल्हापूर पोलिसांची दोन दिवसांत बैठक होत आहे. त्यानंतर कोल्हापूर पोलिस त्याचा ताबा घेऊन त्याला सत्र न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी दिली. तावडेच्या अटकेनंतर पानसरे हत्येच्या तपासाला आणखी गती येणार आहे.

वीरेंद्र तावडे याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीमध्ये आठ वर्षांपूर्वीचे कोल्हापूर कनेक्शन पुढे आले. तो पानसरे हत्या प्रकरणात पहिल्यापासून कोल्हापूर पोलिसांच्या रडारवर होता. संशयित समीर गायकवाडच्या चौकशीमध्ये त्याचे नाव पुढे आले आहे. समीरनंतर दुसरा संशयित तावडे होता. त्याला घाईगडबडीत अटक करून त्याचा ‘दुसरा समीर’ होऊ नये, याची दक्षता कोल्हापूर पोलिसांनी घेतली होती. त्याला अटक केल्यानंतर पानसरे हत्येसंबंधी धक्कादायक पुरावे हाती येतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Give Talwade to Kolhapur Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.