दोन लाख द्या; कृषी पर्यवेक्षक म्हणून हवी तिथे बदली देतो, कृषी खात्यात बदल्यांचा बाजार  

By विश्वास पाटील | Published: June 1, 2023 04:15 PM2023-06-01T16:15:27+5:302023-06-01T16:15:59+5:30

पैशाच्या मागणीने अस्वस्थ झालेल्या काही कृषी सहायकांनीच ‘लोकमत’ला या मागणीबद्दल अत्यंत जबाबदारीने माहिती दिली

Give two lakhs Transfers as Agricultural Supervisor as required in agriculture department | दोन लाख द्या; कृषी पर्यवेक्षक म्हणून हवी तिथे बदली देतो, कृषी खात्यात बदल्यांचा बाजार  

दोन लाख द्या; कृषी पर्यवेक्षक म्हणून हवी तिथे बदली देतो, कृषी खात्यात बदल्यांचा बाजार  

googlenewsNext

विश्वास पाटील

कोल्हापूर : राज्य शासनाच्या सेवेतील कृषी सहायकांनी स्वत: परिश्रम करून विभागांतर्गत परीक्षा दिली, त्याचा निकाल नुकताच लागला आणि आता त्यांना कृषी पर्यवेक्षक (सुपरव्हायझर) म्हणून पदस्थापना देताना सरासरी दोन लाख रुपयांची मागणी होऊ लागली आहे. या कर्मचाऱ्यांना विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातून फोन जात आहेत. बदल्याची मुदत वाढली तरी हे व्यवहार थांबलेले नाहीत.

पैशाच्या मागणीने अस्वस्थ झालेल्या काही कृषी सहायकांनीच ‘लोकमत’ला या मागणीबद्दल अत्यंत जबाबदारीने माहिती दिली. राज्यात एकूण ७५० पदे आहेत. कोल्हापूर विभागात कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत मिळून ८२ पदे आहेत. त्यासाठी ४०० उमेदवारांनी परीक्षा दिली. खात्यांतर्गत सहायकांतून पर्यवेक्षक करण्यासाठी ही परीक्षा होती.

सध्या कृषी सहायकांना २४०० रुपये ग्रेड पे मिळते. ही परीक्षा गुणवत्तेनुसार उत्तीर्ण झाल्यावर ग्रेड पे ४२०० रुपये होतो व भविष्यात मंडळ कृषी अधिकारी म्हणून पदोन्नतीची संधी असते. त्यामुळे या सहायकांनी कष्ट घेतले. चांगला अभ्यास केला. चांगले गुण मिळविले आणि आता पदस्थापना होताना पैशाची मागणी होऊ लागल्याने ते विषण्ण झाले आहेत.

कुठेही करा बदली, आम्ही तिकडे जातो किंवा आम्हाला ते पदच नको, अशीही उद्विग्न भावना त्यातील काहींनी बोलून दाखविली. आंतरसहभागीय म्हणजे एका विभागातून दुसऱ्या विभागात यायचे असल्यास दोन्ही विभागांची ना-हरकत लागते. हे पत्र देण्यासाठी ५० हजार ते १ लाखापर्यंतची मागणी केली जात आहे.

कोण म्हणते पैशाची मागणी केली..

  • ‘लोकमत’ने कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांच्याशी संपर्क साधला. कृषी सहायकांतून पर्यवेक्षक म्हणून पदोन्नतीवर बदली करताना तुमच्या कार्यालयातील आस्थापना विभागाचे कर्मचारी कर्मचाऱ्यांकडे दोन लाख रुपयांची मागणी करीत आहेत, अशा तक्रारी ‘लोकमत’कडे आल्या असल्याचे त्यांना थेटच विचारले. त्यावर बिराजदार अगोदर हसले. ते म्हणाले, असा कोणताही प्रकार बदल्यांसाठी केला जात नाही.
  • पारदर्शकपणे आणि कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊनच हे काम सुरू आहे. मुद्दाम काम डिस्टर्ब व्हावे, यासाठी कोणीतरी हे सांगत असावे. तुमच्याकडे कोण, असे लोक आहेत का, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर असे पाच-सहा लोक ‘लोकमत’ कार्यालयात येऊन गेल्याचे सांगितल्यावर त्यांनी तुम्ही त्यांना पैसे देऊ नका, असे सांगा, असे उत्तर दिले.

Web Title: Give two lakhs Transfers as Agricultural Supervisor as required in agriculture department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.