'त्या' महिलेला पर्यायी जागा द्या
By admin | Published: February 4, 2015 12:47 AM2015-02-04T00:47:39+5:302015-02-04T00:47:49+5:30
राजाराम माने : नानीबाई चिखली ग्रामपंचायतीला सूचना
म्हाकवे : पतीचे एड्सने निधन झाल्याने नानीबाई चिखली (ता. कागल) येथील ग्रामपंचायतीने राहण्यासाठी जागा उपलब्ध करून न दिल्याने थेट स्मशान शेडमध्येच संसार थाटलेल्या संगीता संजय गायकवाड यांची बातमी प्रसिद्ध होताच त्याची जिल्हा प्रशासनाने त्वरित दखल घेतली. पर्यायी जागा देण्याची सूचना जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी माने, तहसीलदार शांताराम सांगडे, मुरगूडचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत मस्के, मंडल अधिकारी सुंदर जाधव आदींनी दखल घेऊन ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाला गायकवाड यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासंबंधी सूचना दिल्या. त्यानंतर येत्या पंधरा दिवसांत गायकवाड यांना पर्यायी जागा उपलब्ध करण्याचे आश्वासन सरपंच मुहम्मद मुल्लाणी यांनी दिले.१४ वर्षांपूर्वी शेतमजुरीच्या निमित्ताने यल्लूर (ता. वाळवा) येथून गायकवाड कुटुंब येथे आले. १ जानेवारी २०१३ मध्ये संजय गायकवाड यांचे एड्समुळे निधन झाले. त्यानंतर दोन मुलांसह संगीता या भाड्याच्या घरात राहत होत्या; परंतु दोन ते तीन घरमालकांनी त्यांना घराबाहेर काढल्यामुळे तिचा संसार उघड्यावर पडला. राहण्यासाठी जागा मिळावी, यासाठी त्यांनी वारंवार ग्रामपंचायत, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्जविनंत्या केल्या; परंतु कायद्यातील नियमावली सांगून प्रशासनाने वेळकाढूपणाच केला. त्यामुळे त्यांनी आपला संसार थेट स्मशान शेडमध्येच थाटला. कोंबड्यासह दोन जनावरांनाही तेथेच बांधण्यात आले.
जिल्हाधिकारी माने यांनी या महिलेला शासकीय गायकवाड यांना वसतिगृहात जाण्यासंबंधी पर्याय सुचविला; परंतु त्याला विरोध करत तेथेच जागा देण्याचा त्यांनी हट्ट धरला. ग्रामपंचायतीकडून जागेची व्यवस्था होईपर्यंत सामाजिक कार्यकर्ते नितीन मगदूम यांनी आपल्या शेतवडीतील जागा देण्याचे मान्य केले. यावेळी युवा नेते प्रवीण भोसले, तंटामुक्त अध्यक्ष रामचंद्र बेनाडे, तलाठी पी. आर. फर्नांडिस आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)