उद्यापर्यंत लेखी सूचना द्या : पवार
By Admin | Published: October 24, 2016 12:46 AM2016-10-24T00:46:02+5:302016-10-24T00:46:02+5:30
प्राधिकरण : हद्दवाढविरोधी समितीची बैठक
कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीला मुख्यमंत्र्यांनी प्राधिकरणाचा पर्याय दिला आहे. या संदर्भात विकासाच्या संकल्पना काय असाव्यात, यासाठी लेखी सूचना उद्या, मंगळवारपर्यंत द्याव्यात, असे आवाहन सर्वपक्षीय हद्दवाढविरोधी कृती समितीचे अध्यक्ष माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी रविवारी येथे केले. ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृह येथे प्राधिकरणासंदर्भात सूचना मागविण्यासाठी सर्वपक्षीय हद्दवाढविरोधी कृती समितीतर्फे आयोजित १८ गावांतील प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते.
ते म्हणाले, विकासासाठी राज्यात इतर ठिकाणी राबविलेली प्राधिकरणे वेगळी आहेत. कोल्हापूरसाठी मुख्यमंत्र्यांनी पर्याय दिलेले प्राधिकरण वेगळे आहे. १८ गावांसाठी व दोन एमआयडीसींकरिता हे प्राधिकरण असणार आहे.
प्रवक्ते नाथाजीराव पोवार म्हणाले, कोल्हापूरला पर्याय दिलेल्या प्राधिकरणाबाबत संबंधित गावांनी आपली मते मांडून ती शासनाला कळविणे गरजेचे आहे. आम्हाला कशा प्रकारचा विकास हवा आहे, शासनाने आम्हाला या सुविधा द्याव्यात अशा सूचना येणे अपेक्षित आहे. या लेखी स्वरूपातील सूचना उद्या, मंगळवारपर्यंत संबंधित गावांनी द्याव्यात. त्या एकत्र करून त्यांवर कृती समितीतर्फे आपलेही मत जोडून या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना गुुरुवारी (दि. २७) सादर केल्या जातील.
बैठकीत १८ गावांतील प्रतिनिधींनी आपल्या सूचना तोंडी मांडल्या. आमचे हक्क अबाधित राहिले पाहिजेत, विकासाची वाढ करताना ती आडवीऐवजी उभी करावी, जेणेकरून उत्पन्नाचे स्रोत असलेल्या शेतीचे नुकसान होणार नाही, अशा स्वरूपाच्या सूचना मांडण्यात आल्या.
यावेळी महेश चव्हाण, एम. एस. पाटील, रावसाहेब दिगंबरे, सलीम महात, आदींसह १८ गावांतील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. (प्रतिनिधी)
४संपतराव पवार-पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढीऐवजी प्राधिकरणाचा दिलेला पर्याय ही एक संधी आहे. त्यांनी ग्रामीण भागातील लोकांचे हक्क अबाधित ठेवून विकास केला जाईल, अशी यापूर्वीच ग्वाही दिली आहे.
४त्यामुळे प्राधिकरणाच्या माध्यमातून आपापल्या गावात विकासाची नेमकी संकल्पना काय आहे, याबाबत लेखी सूचना मंगळवारपर्यंत प्रवक्ते नाथाजीराव पोवार यांच्याकडे द्याव्यात. या सूचनांचे एकत्रीकरण करून त्या गुरुवारी (दि. २७) जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्या
जाणार आहेत.