लाभाची रक्कम थेट घरी देणार
By Admin | Published: November 3, 2014 09:23 PM2014-11-03T21:23:58+5:302014-11-04T00:23:54+5:30
निराधार योजना : इचलकरंजीतील १०,७४४ लाभार्थ्यांना मिळणार लाभ
इचलकरंजी : संजय गांधी निराधार व तत्सम योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्यापासून त्यांच्या घरी जाऊन लाभाची रक्कम देण्याचा निर्णय येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या योजनेतील १०,७४४ लाभार्थ्यांना देण्यात येणारी ६९ लाख रुपयांची रक्कम प्रती महिना बायोमॅटिक पद्धतीने आणि आयसीआयसीआय बॅँकेमार्फत मिळणार आहे.
आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. बैठकीसाठी पुरवठा निरीक्षण अधिकारी के. बी. देसाई, अव्वल कारकून बाळासाहेब कोळी, पुरवठा निरीक्षक सचिन हाके, राहुल काळे, महेश खेतमर, वरणे, राखी माने, आदी अधिकारी उपस्थित होते.
इचलकरंजी शहरासह चंदूर, कबनूर, कोरोची, खोतवाडी व तारदाळ या गावांत २० केंद्रे स्थापून तेथून लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या हातात दिली जाईल, असे आमदार हाळवणकर यांनी बैठकीनंतर सांगितले. ते म्हणाले, सध्या या योजनेतील लाभार्थ्यांना जिल्हा मध्यवर्ती बॅँकेमार्फत रक्कम दिली जाते. त्यामुळे बॅँकेकडे वृद्ध, अपंग अशा लाभार्थ्यांची गर्दी होते. रक्कम घेण्यासाठी दिवसभर रांगेत थांबावे लागते. तसेच बॅँकेतील रक्कम
मिळवून देण्यासाठी काही एजंटही निर्माण झाले आहेत. त्यांना ठरावीक रक्कम द्यायला लागते. असा सर्व प्रकारचा त्रास वाचविण्यासाठी लाभार्थ्यांच्या गावात व परिसरात असलेल्या २० केंद्रांतून ही रक्कम दिली जाईल. तसेच शहरातील ५० हजार ३५९ केसरी शिधापत्रिकाधारकांना पुढील महिन्यापासून दहा किलो गहू व पाच किलो तांदूळ नियमितपणे देण्याची व्यवस्था करण्यात येईल. शिधापत्रिकांवरील धान्य मिळणारी दुकाने सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ या वेळेत नियमितपणे उघडली जातील. हयगय करणाऱ्या दुकानांची पुरवठा निरीक्षकांकडून अचानक भेटी देऊन तपासणी होईल. तसेच नवीन शिधापत्रिका, दुबार शिधापत्रिका आणि विभक्त शिधापत्रिका देण्यासाठी शहरातील सर्व नऊ महा ई- सेवा केंद्रांमध्ये अर्ज भरून घेतले जातील. तशी सुविधा करण्याच्या सूचना तहसीलदारांकडून दिल्या जातील आणि या शिधापत्रिका १५ दिवसांत मिळण्याची सोय केली जाईल, असेही या बैठकीमध्ये निश्चित केले. (प्रतिनिधी)
कारवाईचा निर्णय
शिवाजी खावट यांच्या पिवळ्या शिधापत्रिकेवर नियमाप्रमाणे युनिट वाढवून न देणाऱ्या दुकानदार दिनकर पाटील यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचा निर्णय याच बैठकीत घेण्यात आला. तसेच शहरात व ग्रामीण भागात विविध ठिकाणी असलेल्या दुकानांना निरीक्षकांनी नियमितपणे पण अचानक भेटी देऊन तपासणी करावी, असेही यावेळी ठरविण्यात आले.