दहावीच्या कलचाचणी प्रमाणपत्रांचे उद्यापासून वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 03:37 PM2019-03-15T15:37:16+5:302019-03-15T15:39:28+5:30
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या कल-अभिक्षमता चाचणी प्रमाणपत्रांचे वाटप उद्या, शनिवारपासून शाळांकडून होणार आहे. कोल्हापूर विभागातील एक लाख ३९ हजार ८०० विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली होती. बारावी परीक्षेत गुरुवारी सहकार विषयाच्या पेपरला कॉपी करताना भरारी पथकाने तीन परीक्षार्थींना पकडले.
कोल्हापूर : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या कल-अभिक्षमता चाचणी प्रमाणपत्रांचे वाटप उद्या, शनिवारपासून शाळांकडून होणार आहे. कोल्हापूर विभागातील एक लाख ३९ हजार ८०० विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली होती. बारावी परीक्षेत गुरुवारी सहकार विषयाच्या पेपरला कॉपी करताना भरारी पथकाने तीन परीक्षार्थींना पकडले.
या कल-अभिक्षमता चाचणी अहवालाचे वाटप शिक्षण मंडळाकडून शाळांना त्यांच्या जिल्हा संकलन अथवा वितरण केंद्रावर आज, शुक्रवारी होईल. उद्या, शनिवार ते शुक्रवार (दि. २२) दरम्यान शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना पेपरच्या दिवशी संबंधित परीक्षा केंद्रांवर शाळा प्रतिनिधीला पाठवून विद्यार्थ्यांची तक्ता अथवा यादीवर स्वाक्षरी घेऊन अहवाल प्रमाणपत्रांचे वाटप करावयाचे आहे. वाटपाचे काम पेपर संपल्यानंतरच केले जाणार आहे, अशी माहिती शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सहसचिव टी. एल. मोळे यांनी दिली.
दरम्यान, बारावीच्या परीक्षेत गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत सहकार विषयाचा पेपर झाला. त्या दरम्यान कुुरुंदवाड येथील एस. के. पाटील महाविद्यालयाच्या केंद्रावर तीन परीक्षार्थींना भरारी पथकाने कॉपी करताना पकडले. त्यांच्यावर शिक्षण मंडळाच्या नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. बारावीच्या परीक्षेचा अखेरचा पेपर बुधवारी (दि. २०), तर दहावीचा शेवटचा पेपर शुक्रवारी (दि. २२) होणार असल्याचे मोळे यांनी सांगितले.