राजर्षी शाहू महाराजांचे नाव दिल्याने ‘भारिप’चा आनंदोत्सव
By admin | Published: March 25, 2015 10:51 PM2015-03-25T22:51:24+5:302015-03-26T00:06:10+5:30
‘लोकमत’चे खास अभिनंदन : कार्यालयात येऊन मानले आभार
कोल्हापूर : जिल्ह्यातील शित्तूर वारुण (ता. शाहूवाडी) येथील शाळेला ‘विद्यामंदिर हरिजनवाडा’ नाव असल्याचे ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणले. त्यानंतर शाळेचे ‘राजर्षी शाहू महाराज विद्यामंदिर’ असे नामांतर झाले. त्यामुळे भारिप बहुजन महासंघातर्फे दसरा चौकात बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता साखर, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा झाला. दरम्यान, कार्यालयात येऊन नामांतरात ‘लोकमत’चा महत्त्वाचा वाटा असल्याचे ‘भारिप’च्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. त्यांनी ‘लोकमत’चे अभिनंदनही केले. ‘लोकमत’ने सर्वप्रथम ३ मार्च रोजी हे वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला. त्याची दखल घेऊन मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या शाळेचे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यामंदिर’ असे नामांतर करण्याचा निर्णय झाला.
आनंदोत्सवात ‘भारिप’चे जिल्हा अध्यक्ष दिगंबर सकट, उपाध्यक्ष प्रशांत वाघमारे, सुभाष कापसे, संजय गुदगे, संभाजी कांबळे, वर्षा कांबळे, प्रिया कांबळे, आदी उपस्थित होते.