तीन हजार उचल द्या--‘शेकाप’ची साखर आयुक्तांकडे मागणी
By Admin | Published: October 29, 2016 12:08 AM2016-10-29T00:08:22+5:302016-10-29T00:20:56+5:30
१४ दिवसांत एकरकमी ‘एफआरपी’ द्यावीच लागेल : शर्मा
कोल्हापूर : यंदाच्या हंगामात तीन हजार रुपये पहिली उचल द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतली. उसाचे उत्पादन कमी असल्याने साखरेला चांगला दर मिळणार आहे. त्यामुळेच उसाला किमान प्रतिटन ३७०० रुपये अंतिम दर मिळालाच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
साखर कारखान्यांचा यंदाचा हंगाम नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे हातातोंडाशी आलेले ऊस पीक उद्ध्वस्त झाले. त्यानंतर अतिवृष्टीमुळे उसाला फटका बसला. उसाची वाढ होऊ शकलेली नाही. परिणामी, यंदा उसाचे उत्पादन सरासरीपेक्षा ४० टक्के घटणार आहे; त्यामुळे साखर उत्पादनही कमी होणार असून, आगामी काळात साखरेला चांगला भाव मिळू शकतो; पण गेल्या दोन वर्षांची ‘एफआरपी’ सारखीच ठेवल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. दरवर्षी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत जातो, त्या पटीत ‘एफआरपी’त वाढ होणे अपेक्षित होते. गतहंगामात प्रतिकूल हवामानामुळे साखर उतारा घटला आहे. परिणामी, सरासरी ‘एफआरपी’मध्ये एक टक्क्याने घट होणार आहे. त्याचा फटका प्रतिटन २४२ रुपये बसणार आहे. त्याचबरोबर ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीत २० टक्के, तर मुकादमांच्या मजुरीमध्येही अर्धा टक्का वाढ झाली आहे. यामुळे या हंगामात तीन हजार पहिली उचल व ३७०० रुपये अंतिम दर द्यावा, अशी मागणी ‘शेकाप’चे राज्य सहचिटणीस माजी आमदार संपतराव पवार यांनी केली.
यावर १४ दिवसांत एकरकमी एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे; पण गतवर्षी तडजोड झाल्याने दोन हप्ते झाले. यंदा मात्र एकरकमी एफआरपी कारखानदारांना द्यावीच लागेल, असे शर्मा यांनी सांगितले. यावेळी संजय डकरे, सरदार पाटील, अंबाजी पाटील, केरबा पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)
उसाला तीन हजार रुपये पहिली उचल द्यावी, या मागणीचे निवेदन ‘शेकाप’च्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त विपीन शर्मा यांना दिले. यावेळी संपतराव पवार, बाबासाहेब देवकर, केरबा पाटील, आदी उपस्थित होते.