एक ग्लास ज्यूस ६० रुपयांना, २ किलोचे कलिंगड २० रुपयांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:23 AM2021-03-18T04:23:41+5:302021-03-18T04:23:41+5:30
काेल्हापूर : कलिंगडाच्या एक ग्लास ज्यूसची किंमत ६० रुपये, कलिंगडाच्या एका प्लेटची किंमत १० ते २० रुपये तर अख्खे ...
काेल्हापूर : कलिंगडाच्या एक ग्लास ज्यूसची किंमत ६० रुपये, कलिंगडाच्या एका प्लेटची किंमत १० ते २० रुपये तर अख्खे २ किलो वजनाचे कलिंगड १० ते २० रुपयांना अशा विचित्र बाजार भावाचा सध्या अनुभव येत आहे. विकणारा मालामाल आणि पिकवणाऱ्याला कंगाल करणाऱ्या धोरणाचा शेतकरी पुन्हा एकदा बळी ठरला आहे.
तितक्याच जोखमीचे पण कमी वेळात चांगले पैसे मिळवून देणारे पीक म्हणून कलिंगडाची शेती वाढली आहे, पण त्यामानाने दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळू लागले आहे. बाजारात पडलेले दर पाहून उत्पादनाचा राहू दे निदान वाहतुकीचा खर्च तरी निघेल ही आशाही फोल ठरु लागली आहे.
उसाची लावण, खोडव्यासह माड्या रानात कलिंगडाची शेती करण्याकडे कल वाढला आहे. जास्त फळे मिळत असल्याने हिरव्या पांढऱ्या पट्ट्याचे मधुबाला या कलिंगड ऐवजी शुगर या काळ्या पाटीचे कलिंगडाच्या लागवडीला शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले जात आहे. कलिंगडाची एका बियाची किंमत २ रुपये प्रतिनग अशी आहे. लागणीपासून ते फळ काढणीपर्यंत फवारण्यांचा खर्च पाहिला तर नाकापेक्षा मोती जड अशी कलिंगडाची शेती झाली आहे. बदलत्या हवामानामुळे ग्रोथ रेग्युलेटर्स जास्त प्रमाणात फवारावे लागतात. औषध दुकानात कोणतेही ग्रोथ रेग्युलेटर व इतर कीटकनाशकांचा दर लिटरला १००० रुपयांच्या खाली नाही.
एवढी महागडी खते, औषधे देऊन तयार केलेले फळ किमान ४० ते ५० रुपयांना विकले गेले तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च जाऊन काही नफा शिल्लक राहतो, पण सध्या बाजारातील १० आणि २० रुपये असे दर पाहिल्यावर शेतकऱ्यांचा विक्रीसाठी आणलेला वाहतुकीचा खर्चही निघेनासा झाला आहे. ग्रामीण भागात फारशी विक्री होत नसल्याने शेतकरी ट्रॉल्यांमधून घेऊन शहराकडे धाव घेत आहेत, पण येथेही गिऱ्हाईक आणि दरही नसल्याने ढिगाकडे पाहत बसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.