अंधारलेल्या डोळ्यांना ‘स्नेहज्योती’कडून आशेचा किरण

By admin | Published: July 24, 2014 10:12 PM2014-07-24T22:12:55+5:302014-07-24T22:31:26+5:30

अंधांचे जीवन प्रकाशमय करण्याचे रोपटे

A glimmer of hope for the dark eyes 'Snehajyoti' | अंधारलेल्या डोळ्यांना ‘स्नेहज्योती’कडून आशेचा किरण

अंधारलेल्या डोळ्यांना ‘स्नेहज्योती’कडून आशेचा किरण

Next

शिवाजी गोरे -दापोली
मरावे परी कीर्तीरुपी उरावे, या उक्तीप्रमाणे मंडणगड तालुक्यातील स्नेहज्योती अंधांच्या जीवनात प्रकाश देण्याचे काम करत आहे. सुनीता कामत व प्रतिभा सेनगुप्ता या दोन बहिणींनी घराडी येथे २००३ मध्ये अंध विद्यालय सुरु करुन अंधांचे जीवन प्रकाशमय करण्याचे रोपटे लावले. या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. यामागे संस्था व दानशूर व्यक्तींनी डोळसपणे केलेले कार्यसुद्धा प्रेरणादायी ठरले आहे.
मंडणगड तालुक्यातील दुर्लक्षित ग्रामीण भागातील घराडी येथे अंध मुलांसाठी शाळा काढण्याचा निर्णय या दोन बहिणीनी घेतला. त्यानंतर अनेक हात मदतीसाठी पुढे आले. आपल्या वडिलोपार्जित जमिनीचा समाजकार्यासाठी उपयोग व्हावा, या हेतूने पुण्यातील नोकरी सोडून प्रतिभा सेनगुप्ता घराडी येथे आल्या. तसेच मुंबईत सुशिक्षित घराण्यातील सुनीता शशिकांत कामत यांनी गावचा ध्यास घेतला. आई - वडिलांच्या वडिलोपार्जित शेतीचा समाजाच्या कल्याणासाठी वापर व्हावा, या उदात्त हेतूने जिल्ह्यातील पहिली अंध शाळा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याकाळी अंधांसाठीसुद्धा वेगळी शाळा असते. ही संकल्पना इतरांना व खासकरुन अंधांना माहीत नव्हती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात पालक अंधशाळेत पाठवायला तयार नव्हते. त्यामुळे ३ मुलांपासून ही शाळा सुरु झाली. स्वप्नील पड्याळ, निकिता बर्जे, दीपिका बर्जे या तीन विद्यार्थ्यांपासून शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. आज या शाळेत ३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
स्नेहज्योती अंध विद्यालय, घराडी येथे शिक्षण घेण्यासाठी येणारी सर्व मुले गरीब घरातील असल्यामुळे या मुलांच्या वसतिगृहापासून, शिक्षणापर्यंतची संपूर्ण जबाबदारी संस्थेने स्वीकारली. अंध मुलांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी या संस्थेने अहोरात्र मेहनत घेतली. अंध मुलेही इतरांप्रमाणे डोसळपणे जगायला हवीत, म्हणून त्यांना शिक्षणाबरोबरच कार्यानुभव, संगीत, वाद्य, गायन, स्वयंरोजगाराचे शिक्षण दिले जाते. स्नेहज्योती अंध विद्यालय, घराडी अंध मुलांच्या जीवनात ज्योतीने ज्योत पेटवून समाजात त्यांना डोळसपणे जगण्याचा हक्क निर्माण करुन देत आहे.
सुरुवातीच्या काळात संस्थेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. मुलांना शाधून आणण्यापासून, त्यांना शाळेत शिक्षण देण्यापर्यंत लागणारा संपूर्ण आर्थिक खर्च संस्थेला उचलावा लागत होता. त्यानंतर संस्थेने समाजात केलेल्या जनजागृतीच्या जोरावर हळूहळू विद्यार्थी येऊ लागले. परंतु शिक्षक मिळेनासे झाले. त्यामुळे शिक्षकांना शोधून आणावे लागले. त्यांना मानधन, मुलांचा खर्च, शिपाई, पहारेकरी, स्वयंपाकी सर्वांचा खर्च संस्थेला पेलवेनासा झाला. त्यामुळे कामत व सेनगुप्ता या बहिणींना पदरमोड करावी लागली. कित्येकवेळा त्यांनी मोठ्या धाडसाने मुलांच्या हितासाठी कटू निर्णय घेतले. एखादा विद्यार्थी आजारी असल्यास स्वत: गाडीत बसवून रात्री - अपरात्री दवाखान्यात घेऊन जातात. शाळेतील अंध मुलांना पोटच्या बाळाप्रमाणे सांभाळतात. संस्थेवर जातीनिशी लक्ष देऊन या रोपट्याचे वृक्षात रुपांतर केले.
स्नेहज्योती अंध विद्यालय अंध मुलांच्या जीवनात ज्योतीने ज्योत पेटवण्याचे महान कार्य करत आहे. सुरुवातीच्या काळात कष्ट घेतल्यामुळे शाळेला चांगले दिवस आले. आज या शाळेला सचिन तेंडुलकरसारख्या भारतरत्नाने भेट देऊन या मुलांचे जीवन प्रकाशमय करण्याचा प्रयत्न केला. संस्थेला आज देणगीसाठी हजारो हात पुढे आले आहेत. कधीकाळी याच संस्थेला मुलांचे रेशनिंगसुद्धा उधार किंवा उसने आणावे लागत होते. परंतु चांगले काम केले की, समाजात देणारे हजारो हात पुढे येतात एवढे मात्र नक्की आहे, हे स्नेहज्योती या संस्थेने समाजाला दाखवून दिले. स्नेहज्योती अंध विद्यालयात अनेकांचे मदतरुपी स्नेह आहे. या संस्थेला अनेक दानशूर व्यक्तिंनी हातभार लावल्याने स्नेहज्योती अंध विद्यालयाच्या रोपट्याचे वृक्षात रुपांतर व्हायला वेळ लागला नाही. संस्थेने काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करुन त्यांना दृष्टीही मिळवून दिली आहे. या संस्थेचे कार्य निश्चितच समाजभूषणाचे आहे.

Web Title: A glimmer of hope for the dark eyes 'Snehajyoti'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.