गडहिंंग्लजमध्ये ‘मराठा एकी’ची झलक !
By admin | Published: October 1, 2016 12:37 AM2016-10-01T00:37:09+5:302016-10-01T00:41:54+5:30
भव्य मूकफेरी : मोर्चा पूर्वतयारी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
गडहिंग्लज : कोल्हापुरात होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज शहर व तालुक्यातील मराठा समाजबांधवांनी आपल्या एकजुटीची झलक दाखविली. मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित मेळाव्यास मराठासह सर्वधर्मीय समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेळाव्यानंतर शहरातून भव्य मूकफेरी काढण्यात आली.
सायंकाळी येथील बॅ. नाथ पै विद्यालयाच्या मैदानावर हा मेळावा झाला. तत्पूर्वी, युवकांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढली. मेळाव्यानंतर काढण्यात आलेली मूकफेरी लक्षवेधी ठरली.
आमदार संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये आणि उभारणीत मराठ्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या सहनशीलतेचा अंत न
पाहता आरक्षणाचा निर्णय व्हावा, अन्यथा वादळापूर्वीची शांतता
ठरेल.
मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, आरक्षणाच्यानिमित्ताने समाजाच्या एकोप्याची-जिव्हाळ्याची नांदी झाली आहे. ती मोर्चानंतरही कायम राहावी. अॅट्रॉसिटी कायदा रद्द नव्हे, तर त्याचा गैरवापर होऊ नये, त्यात दुरुस्ती करावी.
यावेळी शिवाजीराव भुकेले, यशवंत कोले, पी. डी. पाटील यांचीही भाषणे झाली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वसंत यमगेकर यांनी मागण्यांचे वाचन, तर अॅड. दिग्विजय कुराडे यांनी मोर्चाची आचारसंहिता सांगितली.
मेळाव्यास नगराध्यक्ष राजेश बोरगावे, सभापती मीनाताई पाटील, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, विठ्ठल बन्ने, बाळासाहेब कुपेकर, भय्या कुपेकर, संग्रामसिंह नलवडे, रामराजे कुपेकर, बी. एन. पाटील, नंदिनी बाभूळकर, उदयराव जोशी, राजशेखर दड्डी, बाळेश नाईक, सुनील शिंत्रे, सोमगोंडा आरबोळे, दिलीप माने, रमेश रिंगणे, संजय चाळक, शिवाजी खोत आदी उपस्थित होते. प्रारंभी डॉ. किरण खोराटे यांनी शिववंदना सादर केली. मराठा मंडळाचे अध्यक्ष किरण कदम
यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
माजी नगराध्यक्ष राजेंद्र मांडेकर
यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)
नराधमांना फाशी द्या
कोपर्डी घटनेतील नराधमांना फाशी द्या, अशी आग्रही मागणी स्नेहल लवटे, ज्योत्स्ना लोहार व धनश्री देसाई या युवतींनी आपल्या मनोगतातून केली. वर्षा पोटे-पाटील या चिमुकलीचे मनोगतही लक्षवेधी ठरले.