शिवचरित्र बाळकृष्णांमुळे वैश्विक
By Admin | Published: September 25, 2016 01:20 AM2016-09-25T01:20:09+5:302016-09-25T01:20:09+5:30
नारायण राणे : इंद्रजित सावंत संपादित ‘शिवाजी द ग्रेट’ ग्रंथाचे प्रकाशन
कोल्हापूर : स्वातंत्र्यपूर्वकाळाआधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर इंग्रजीमध्ये ग्रंथ लिहून डॉ. बाळकृष्ण यांनी शिवचरित्र जागतिक स्तरावर नेले. त्यांनी महाराष्ट्रावर आणि भारतावर अनंत उपकार करून ठेवले आहेत, अशा शब्दांत राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी डॉ. बाळकृष्ण यांच्या लेखनाचा गौरव केला.
डॉ. बाळकृष्ण लिखित आणि इंद्रजित सावंत संपादित ‘शिवाजी द ग्रेट’ या गं्रथाच्या संपादित आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. शनिवारी सायंकाळी केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांसह वाचकांनी मोठी गर्दी केली होती.
राणे म्हणाले, काहींनी महाराजांच्या नावावर राजकीय आणि सामाजिक फायदा करून घेतला; परंतु इंद्रजित सावंत यांनी शिवरायांवरील प्रेमापोटी हा उपक्रम हाती घेतला. त्यांना सर्व ते सहकार्य केले जाईल. त्यांनी मराठ्यांचा इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळाबाबत लिखाण करून महाराष्ट्रात परिवर्तन घडवावे, अशी अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली.
मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करीत आता यापुढे या सरकारने ते टिकविले पाहिजे. हे सरकार कसला सकल अभ्यास करते आहे आणि शाश्वत विकासाचे काय सांगते आहे? अशी विचारणाही राणे यांनी केली.
दहावीच्या विद्यार्थ्यालाही शिवाजी महाराज कळावेत यासाठी सोप्या इंग्रजीतून हा लिहिलेला ग्रंथ प्रकाशित करण्यात येत असल्याचे यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविकात सांगितले. पाकिस्तानात जन्मलेल्या डॉ. बाळकृष्ण यांनी कोल्हापुरात आल्यानंतर १९३२ मध्ये शिवरायांचे चरित्र इंग्रजीमध्ये लिहिले; परंतु गेली ८० वर्षे कोल्हापूर आणि महाराष्ट्र त्यांना विसरला. शिवरायांना ‘ग्रेट’ म्हणणारा हा एकमेव लेखक होता. म्हणूनच अतिशय परिश्रमाने या ग्रंथाची निर्मिती केल्याचे इंद्रजित सावंत यांनी सांगितले. आमदार सतेज पाटील यांनी हा ग्रंथ देशभरातील ७६९ विद्यापीठांमध्ये पोहोचवणार असल्याचे सांगितले.
अॅड. शंकरराव निकम म्हणाले, अनेकांची राज्ये ही त्या राजांच्या नावे ओळखली गेली; परंतु शिवाजी महाराजांचे राज्य हे रयतेचे राज्य म्हणून ओळखले गेले. राजाराम कॉलेजचे प्राचार्य वसंत हेळवी यांनी हा ग्रंथ सर्व महाविद्यालयांमध्ये पोहोचविण्याची जबाबदारी घेत असल्याचे सांगत सावंत यांचे कौतुक केले.
रायगडावर तिथीने राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा कट उधळण्याचे काम इंद्रजित सावंत यांनी केले आहे. त्यामुळे दबावाला भीक न घालता सावंत यांनी आपले काम पुढे चालू ठेवावे, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वसंतराव मोरे यांनी केले.
यावेळी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, ज्योेतिरादित्य डेव्हलपर्सचे संजय शिंदे उपस्थित होते. मातोश्री वृद्धाश्रमाचे शिवाजीराव पाटोळे, पुराभिलेख विभागाचे अधिकारी गणेश खोडके यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सचिन तोडकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. रमेश जाधव, व्ही. बी. पाटील, गुलाबराव घोरपडे, आनंद माने, दिनेश ओऊळकर, दिलीप मोहिते, गणी आजरेकर, कादर मलबारी, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बाळकृष्ण पुण्यात गेले असते तर दिशा बदलली असती
या कार्यक्रमात नाव न घेता बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर अनेक वक्त्यांनी टीका केली. राणे म्हणाले की, बाळकृष्ण यांनी शिवरायांचे वास्तव चरित्र लिहिले. ते जर पुण्यात राहिले असते तर त्यांच्या लिखाणाची दिशा बदलली असती आणि इंद्रजितचं हे पुस्तक काढण्याचं धाडस झालं नसतं. जरी पुस्तक काढलं असतं तर आंदोलन करावं लागलं असतं. पुण्यात जेम्स लेन कुठे उतरला, काय केले, याची सर्व माहिती मी पुण्यात जाऊन घेतली आहे.
मराठी आवृत्ती
सतेज यांच्याकडे
या इंग्रजी ग्रंथाची मराठी आवृत्ती कोणत्याही परिस्थितीत निघाली पाहिजे, ही जबाबदारी तुम्ही घ्या, असे मी सतेज पाटील यांना मी सांगितले आहे आणि त्यांना सहकार्य लागलेच तर मी आहेच, असेही नारायण राणे यांनी सांगून टाकले.