तेजोमय दिवाळी पर्वाला सुरुवात- बाजारपेठेला नवी ऊर्जा : खरेदीला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 17:52 IST2020-11-12T17:51:17+5:302020-11-12T17:52:46+5:30
diwali, kolhapurnews कोरोनाचा खंबीरपणे सामना केल्यानंतर आलेली दिवाळी साजरी करण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत. सात महिन्यांतील नकारात्मकता, आर्थिक चणचण, व्यवसाय-नोकरीतील संघर्ष हा सगळा ताण आणि मळभ झटकून दिवाळीने आपल्या आगमनाने तेजाने आणि प्रकाशाने मनामनांतील अंधकार दूर केला आहे. या सणामुळे गरिबातील गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांच्याच अर्थचक्राची चाके पुन्हा गतिमान झाल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हर्षोल्हास आणि समाधानाची भावना आहे. सण अवघ्या एक दिवसावर आल्याने बाजारपेठेतही खरेदीला उधाण आले आहे.

तेजोमय दिवाळी पर्वाला सुरुवात- बाजारपेठेला नवी ऊर्जा : खरेदीला उधाण
कोल्हापूर : कोरोनाचा खंबीरपणे सामना केल्यानंतर आलेली दिवाळी साजरी करण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत. सात महिन्यांतील नकारात्मकता, आर्थिक चणचण, व्यवसाय-नोकरीतील संघर्ष हा सगळा ताण आणि मळभ झटकून दिवाळीने आपल्या आगमनाने तेजाने आणि प्रकाशाने मनामनांतील अंधकार दूर केला आहे. या सणामुळे गरिबातील गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांच्याच अर्थचक्राची चाके पुन्हा गतिमान झाल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हर्षोल्हास आणि समाधानाची भावना आहे. सण अवघ्या एक दिवसावर आल्याने बाजारपेठेतही खरेदीला उधाण आले आहे.
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंद, समृद्धीचा सण. दरवर्षी या सणाचे कौतुक असतेच; पण यंदा त्याला कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने जगण्यातला खरा आनंद, आलेला प्रत्येक दिवस मजेने जगण्याची ऊर्मी प्रत्येकालाच कळली आहे. कुटुंबासाठी काटकसर करायचीच; पण आजचा दिवस मजेत जगून घ्यायचा. त्यासाठी थोडा जास्तीचा खर्च झाला तरी चालेल, या भावनेतून लोकांनी या सणाची नव्या जोमाने जय्यत तयारी सुरू केली आहे. सात महिने घरात बसून वैतागल्यानंतर आता दिवाळीच्या फराळाच्या साहित्यापासून ते कपडे, रांगोळी, आकाशकंदील, दिवे, पणत्या, सजावटीचे साहित्य अशा विविध प्रकारच्या खरेदीसाठी कोल्हापूरकर रस्त्यांवर उतरले आहेत.
घराघरांत सजावट
वसुबारसने दिवाळीच्या पर्वाला सुरुवात होते. मात्र मुख्य सोहळा सुरू होतो तो नरकचतुर्दशीला; त्यामुळे आता घराघरांत सजावटीला वेग आला आहे. महिला अजूनही स्वयंपाकघरात फराळ बनवण्यात गुंतल्या आहेत. कुटुंबातील अन्य सदस्य मात्र शोभेचे, दिव्यांचे आकाशकंदील, रोषणाईच्या माळा लावणे, घरादाराची स्वच्छता अशा कामांत व्यस्त आहेत.
किल्ले सजावट
यंदा कोरोनामुळे घरीच बसलेल्या मुलांना किल्ला बनवण्यासाठी भरपूर वेळ मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती नव्या पिढीतील बाल मावळ्यांनी तयार केल्या आहेत. या किल्ल्यांवर आता सजावटीसाठीचा शेवटचा हात मारण्यासाठी त्यांचे हात मातीने रंगले आहेत.