चुयेकरांच्या दूरदृष्टीतूनच ‘गोकुळ’चे वैभव
By Admin | Published: June 5, 2017 01:23 AM2017-06-05T01:23:48+5:302017-06-05T01:23:48+5:30
चुयेकरांच्या दूरदृष्टीतूनच ‘गोकुळ’चे वैभव
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पन्नास वर्षांपूर्वी शेतकऱ्याला जोडधंदा आवश्यक असल्याचे ओळखून आनंदराव पाटील चुयेकर यांनी ‘गोकुळ’ची स्थापना केली. त्यांच्या दूरदृष्टीतूनच ‘गोकुळ’चे हे वैभव निर्माण झाल्याची भावना राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली.
पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील ‘गोकुळ’च्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याचा उद्घाटन समारंभ रविवारी दुपारी झाला. यावेळी अध्यक्षस्थानावरून देशमुख बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘गोकुळ’च्या आवारात उभारण्यात आलेल्या आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
मंत्री देशमुख म्हणाले, चुयेकरांच्या त्यागातून ‘गोकुळ’ची उभारणी झाली. एवढ्या उत्तम पद्धतीनं चाललेल्या संस्थेमध्ये माझं उशिरा येणं झालं. मात्र यापुढच्या काळात गोकुळ दूध संघ बघून या आणि त्याचे अनुकरण करा, असे मी राज्यातील इतर संघांना सांगणार आहे. ‘गोकुळ’चा अहवाल पाहिल्यानंतर क्षणभर मी स्वप्नात आहे असं मला वाटलं; कारण तो सहकारी संस्थेचा अहवाल वाटत नाही. आता शेतकऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ‘गोकुळ’ने चांगले हॉस्पिटल सुरू करावे.
महसूलमंत्री पाटील म्हणाले, ज्यानं चांगलं काम केलं त्याचं ऋण व्यक्त करण्याची हिंदू संस्कृती आहे. याच भावनेतून आनंदराव पाटील-चुयेकर या दूरदूष्टी असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा पुतळा उभारण्यात आला. ‘गोकुळ’चं मी अभिनंदन करतो की त्यांनी केवळ दूध खरेदी आणि विक्री न करता पशुखाद्याचा कारखानाही उभारला. याहीपुढं जाऊन आता ‘गोकुळ’ने शेतकऱ्यांना चांगले बी-बियाणे, खते देण्यासाठी पुढाकार घ्यावा; कारण ‘गोकुळ’मध्ये ती क्षमता आहे. शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी कसा करता येईल, याचा विचार आम्ही आणि मुख्यमंत्री करत आहोत. दूध व्यवसाय चांगला कसा करावा, याची दिशा गोकुळने दिली आहे.
राष्ट्रीय डेअरी विकास निगमचे कार्यकारी संचालक संग्रामसिंह चौधरी म्हणाले, गोकुळने आता मोठी स्वप्ने पाहावीत. ५० लाख लिटरचे दूध संकलन करण्याची क्षमता गोकुळमध्ये आहे. १९६३ पासून आम्ही गोकुळशी संबंधित आहोत. अतिशय चांगल्या पद्धतीने गोकुळचे काम सुरू आहे.
आमदार महादेवराव महाडिक म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्णाच्या अर्थकारणामध्ये गोकुळमुळेच सुबत्ता आली आहे. छोटी-मोठी वादळं आली तरी गोकुळवर काही परिणाम होणार नाही. कारण त्याची मुळं खोलवर रुजली आहेत. येत्या दिवाळीला ९२ कोटी रुपयांचा फरक उत्पादकांना वितरित केला जाणार आहे.
गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले, आनंदराव पाटील-चुयेकर यांनी घालून दिलेल्या मार्गानेच गोकुळची वाटचाल सुरू आहे. स्वामिनाथन आयोगाने १ रुपयातील ७० पैसे शेतकऱ्याला द्या असे सुचवले असताना, गोकुळ मात्र १ रुपायातील ८१ पैसे दूध उत्पादकांना देत आहे. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांचा ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच शिल्पकार प्रभाकर डोंगरसाने, जयश्री आनंदराव पाटील-चुयेकर, राहुल घाटगे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ संचालक रवींद्र आपटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला आमदार अमल महाडिक, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, नामदेवराव भोईटे आदी उपस्थित होते.
पी. एन. माझा अमूल्य दोस्त
महाडिक भाषण करताना पी. एन. पाटील यांचे नाव घेण्यास विसरले. यानंतर त्यांना चिठ्ठी देण्यात आली.
त्यानंतर ते म्हणाले, पी. एन. यांचे नाव मी विसरलो. मात्र त्यांना राग येणार नाही. कारण किंमत न करता येणारा असा हा दोस्त आहे. कधी कुणाला जमले नाही ते पी. एन. यांनी भोगावती कारखान्यात करून दाखवले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात क्रांती करणार
जळगाव येथे भंवरलाल जैन यांच्या घरी कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो होते. तेव्हा त्यांच्या चिरंजीवांशी माझी चर्चा झाली. ठिबक सिंचनचे संच किती स्वस्तात देता येतील याबाबत मी त्यांच्याशी चर्चा केली आहे.
आता मी जाहीर बोलू शकत नाही. मात्र जिल्ह्णातील नेत्यांच्या माध्यमातून ठिबक सिंचनच्या माध्यमातून क्रांती करणार असल्याचे यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले.