‘बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 11:59 PM2019-02-24T23:59:03+5:302019-02-24T23:59:07+5:30

इंद्रजित देशमुख पाठीमागे आपण ज्ञानोबारायांनी सांगितलेले दैवी गुण चिंतित असताना अभय या गुणाबद्दल चिंतन केलं होतं. अभयासोबत सलगच आणखीन ...

'The glory of the intellect is no other two' | ‘बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे’

‘बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे’

googlenewsNext

इंद्रजित देशमुख
पाठीमागे आपण ज्ञानोबारायांनी सांगितलेले दैवी गुण चिंतित असताना अभय या गुणाबद्दल चिंतन केलं होतं. अभयासोबत सलगच आणखीन एक गुण माउलींनी चिंतिलेला आहे आणि तो म्हणजे शुद्ध व सात्विक बुद्धी होय. खरंतर आत्मविकसनासाठी आम्हाला जी धडपड करावी लागते त्या सर्व धडपडीच्या प्रयत्नांमध्ये आवश्यक असणारी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुद्ध सत्त्वात्मक बुद्धी होय. यासाठीच या बुद्धीला सत्व संशुद्धी असं म्हटलं गेलेलं आहे. या संशुद्धीच्या जोरावर आमचा भौतिक आणि आध्यात्मिक प्रवास सुगम होऊ शकतो आणि म्हणूनच आमच्याकडे ही बुद्धी असणे गरजेचे आहे. व्यक्ती, परिस्थिती, घटना यातून निर्माण झालेले चुकीचे संस्कार आणि त्या संस्कारांमुळे बुद्धीला आलेले मालिन्य एकदा निरसित झाले की, जी शिल्लक उरते ती म्हणजेच शुद्ध सत्त्वात्मक बुद्धी होय.
निसर्गातील प्राणीचक्राची निर्मिती होत असताना माणूस नावाचा एक देखणा प्राणी मोठ्या वैशिष्ट्याने निर्मिला गेला आहे. अगदी संतांच्या शब्दात सांगायचं झालं तर
आहार निद्रा भय मैथुन।
सर्व योनिशी समसमान।
परी मनुष्यदेहीचे ज्ञान।
अधिक जान सर्वाशी।।
माणूस नावाच्या प्राण्याची निर्मिती करत असताना त्याला एक वेगळेपण लाभलेले आहे. ते वेगळेपण म्हणजेच आहार, निद्रा, भय आणि मैथुन. यापेक्षा वेगळी असणारी बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमत्तेच्या आधारावर पृथक्करण करता येणारं ज्ञान माणसाला अधिक मिळालेलंआहे. या बुद्धी वापराच्या जोरावरच माणूस भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती करू पाहतो किंवा करू शकतो. भौतिक विश्वामध्ये माणसाने आपल्या जीवनामध्ये सुख किंवा सहजता येण्यासाठी कितीतरी प्रतिकूल गोष्टींना अनुकूलतेत परावर्तित केलेलं आहे. अगदी सहजगत्या सांगायचं झालं तर तुमच्या, माझ्याभोवती असणाऱ्या कितीतरी कष्ट कमी करणाºया गोष्टी माणसाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर संशोधित केलेल्या आहेत आणि या संशोधनात्मकतेच्या जोरावर माणूस आपलं जीवन सुगम करू पाहतो आहे. हा चमत्काराप्रमाणे वाटणारा बदल माणसाला लाभलेल्या बुद्धी नावाच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणामुळेच झालेला आहे.
वास्तविक आपल्याला लाभलेला बुद्धी नावाचा देखणा गुण जसा विकासासाठी कारणीभूत असतो तसाच विनाशासाठीसुद्धा कारणीभूत असू शकतो. त्याला कारण असतं त्या बुद्धीवर झालेला संस्कार आणि त्यानुसार त्या बुद्धीचा झालेला योग्य किंवा अयोग्य वापर. जीवनात भेटलेली माणसं, त्या माणसांच्याकडून केलेलं वेगवेगळ्या गोष्टींचं अनुकरण व त्याच अंत:करणात झालेलं प्रतिबिंबनं आणि त्यास अनुसरून होणारं वर्तन यावरूनच ठरतं की, आपल्याकडून या बुद्धीवापरामुळे विकास होणार की विनाश. इथे एक गोष्ट मात्र नक्की आहे विनाशासाठी किंवा विकासासाठी कारण बुद्धिमत्ताच असते, पण त्या बुद्धीवर कोणाच्या संपर्कातील आणि कोणतं संस्करण झालं हे महत्त्वाचं असतं. एकाच घरात एकाच आईबापाच्या पोटी जन्माला आलेली चार लेकरं वर्तनाच्या बाबतीत एकसंगत असू शकत नाहीत हा विसंवाद त्या चार लेकरांनी अनुसरलेल्या बुद्धी धारणेमुळे होत असतो. बुद्धीवर झालेल्या शुद्ध व सात्विक संस्कारामुळेच कुणी जगाच्या हिताचा विचार करतो आणि स्वत:च्या सर्व तºहेच्या स्वार्थाला दूर दूर फेकून देतो, तर कुणी स्वत:च्या अंत:करणाचं अंथरूण जगाच्या वाटेवर पसरतो आणि जगाचा त्रास कमी करतो.
इतरांच्या डोळ्यात अश्रू पाहून त्या संवेदनेने तो स्वत:ही व्याकुळ होतो. इतरांच्या आनंदात स्वत:ला खूप आनंदी समजतो. इतरांच्या हिताची वांच्छना करतो. जगाचे कल्याण चिंतित असतो. हा सगळा सात्विक आविष्कार या शुद्ध आणि सात्विक बुद्धी धारणेमुळे होत असतो आणि यातूनच या बुद्धीला परत परत महत्त्व प्राप्त होत असतं. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठामध्ये म्हणतात ‘बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे’
(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत)

Web Title: 'The glory of the intellect is no other two'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.