सदाभाऊ चले जाव; शाहूवाडी तालुक्यात मराठा आंदोलकांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:05 AM2018-08-06T00:05:03+5:302018-08-06T00:05:58+5:30
बांबवडे (जि.कोल्हापूर) : मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासमोर रविवारी सायंकाळी पिशवी (ता.शाहूवाडी) येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी ‘सदाभाऊ चले जाव’ अशा घोषणा देत काळे झेंडे दाखवले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांना किरकोळ लाठीमार करावा लागला. पोलिसांंनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आंदोलक मंत्र्यांपर्यंत पोहचू नयेत यासाठी प्रशासन आणि पोलीस डोळ्यात तेल घालून नियोजन करत असतानाही आंदोलकांनी गनिमी कावा करत हा प्रकार केला.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी शाहूवाडी तालुक्यात विकासकामांचा आढावा घेण्यासाठी दौरा आयोजित केला होता. मराठा समाजाचे बांबवडे येथे ठिय्या आंदोलन सुरु आहे. मंत्री खोत हे आळतूर येथील कार्यक्रम आवरून बांबवडेमार्गे पिशवी येथे कार्यक्रमासाठी जाणार होते, तेव्हा ते बांबवडे येथील आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा देतील अशी अपेक्षा होती. परंतु त्यांनी मार्ग बदलला आणि करंजफेण मार्गे पिशवी येथे दाखल झाले.
पिशवी येथील महादेव मंदीरात रविवारी दुपारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सदाभाऊंच्या उपस्थितीत बैठक सुरु झाल्यावर काही क्षणातच मराठा समाजाचे आंदोलक आरक्षण मागणीच्या घोषणा देत तेथे आले. त्यांनी काळे झेंडे दाखवून ‘सदाभाऊ चले जाव’ अशा घोषणा दिल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांना किरकोळ लाठीमार करावा लागला. आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदाभाऊंना आली चक्कर
दरम्यान, पिशवी येथील बैठक सुरु असताना सदाभाऊ यांना चक्कर आली. यावेळी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
--------------------------------
कोट.........
मराठा आरक्षणासाठी आपण आग्रही असतानाही व्यक्तीदोषातून घोषणाबाजी करून लोकप्रतिनिधीना लक्ष्य करणे चुकीचे आहे. काही राजकीय लोक व्यक्ती दोषातुन आंदोलनाला वेगळे वळण देत आहेत.
- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री.