देशासाठी ‘गोल्ड’ मिळविण्याचेच ध्येय : मिताली गायकवाड; शिवाजी विद्यापीठात तिरंदाजीचा सराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:07 PM2019-01-10T13:07:34+5:302019-01-10T13:08:49+5:30
विविध स्पर्धांमधील यशामुळे आत्मविश्वासात भर पडली आहे. भक्कम आत्मविश्वास, सरावातील सातत्याच्या जोरावर देशासाठी ‘गोल्ड’ मिळविण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी पॅराआॅलिम्पिक स्पर्धेची जिद्दीने तयारी सुरू असल्याचे नाशिकमधील पॅरा आर्चरी आंतरराष्ट्रीय खेळाडू मिताली श्रीकांत गायकवाड हिने सांगितले. शिवाजी विद्यापीठात तिरंदाजीच्या (आर्चरी) सरावासाठी आलेल्या मिताली गायकवाड हिने ‘लोकमत’शी संवाद साधला.
संतोष मिठारी
कोल्हापूर : विविध स्पर्धांमधील यशामुळे आत्मविश्वासात भर पडली आहे. भक्कम आत्मविश्वास, सरावातील सातत्याच्या जोरावर देशासाठी ‘गोल्ड’ मिळविण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी पॅराआॅलिम्पिक स्पर्धेची जिद्दीने तयारी सुरू असल्याचे नाशिकमधील पॅरा आर्चरी आंतरराष्ट्रीय खेळाडू मिताली श्रीकांत गायकवाड हिने सांगितले.
शिवाजी विद्यापीठात तिरंदाजीच्या (आर्चरी) सरावासाठी आलेल्या मिताली गायकवाड हिने ‘लोकमत’शी संवाद साधला.
जकार्ता (इंडोनेशिया) येथे आॅक्टोबर २०१८ मध्ये झालेल्या पॅरा एशियन गेम्स्मध्ये तिने सेकंड रँक पटकाविली. त्यासह विविध व्यावसायिक स्पर्धांमध्ये यश मिळविल्याने आत्मविश्वासात भर पडली असल्याचे मितालीने सांगितले. नेदरलँडमध्ये जून २०१९ मध्ये पॅराआर्चरीची वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि टॉप-टेन रँकिंगसाठीची स्पर्धा होणार आहे. त्यातील रँकिंगसाठीच्या स्पर्धेत देशभरातील ४० खेळाडूंचा समावेश आहे. त्यातून अव्वल १0 खेळाडूंची निवड होणार आहे.
या स्पर्धेतील यश हे टोकिओ (जपान) येथे सन २०२० मध्ये होणाऱ्या पॅराआॅलिम्पिक स्पर्धेतील सहभागासाठी महत्त्वाचे आहे; त्यामुळे जकार्तामधील स्पर्धा झाल्यापासून नेदरलँडमधील स्पर्धेसाठीची तयारी सुरू केली. रोज सकाळी सात ते साडेअकरा आणि दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत सराव करते. व्हीलचेअरवरून स्पर्धा खेळणारी मी एकमेव खेळाडू आहे. प्रशिक्षक रणजित चामले यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सराव सुरू आहे. शिवाजी विद्यापीठात रविवार (दि. ६) पासून तीन दिवस सराव केला. विद्यापीठ प्रशासन आणि डॉ. पी. टी. गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे मिताली हिने सांगितले.
आता पुण्यामध्ये सराव
सरावातील एक वेगळेपण म्हणून राज्यातील विविध शहरांतील मैदानांवर जाऊन तयारी करीत आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत बालेवाडी (पुणे), डेरवण (रत्नागिरी) आणि कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सराव केला आहे. त्यातून एक वेगळा अनुभव आला. आता जूनपर्यंत पुणे येथेच सराव करणार असल्याचे मितालीने सांगितले.