कोल्हापुरात शिवसेनेचे ‘सहा’चे ’दहा’ करणे एवढेच लक्ष्य : कीर्तिकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 02:02 PM2017-10-23T14:02:41+5:302017-10-23T18:05:18+5:30
कोल्हापुरातील विधानसभेच्या १० जागांपैकी सद्य:स्थितीत सेनेचे सहा आमदार आहेत. त्यांत वाढ करून दहा आमदार निवडून आणणे एवढेच लक्ष्य आपल्यापुढे आहे, असे प्रतिपादन शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी केले. शिवसेनेच्या वतीने केशवराव भोसले नाट्यगृहात बहिणींसाठी मोफत हेल्मेट वाटप या कार्यक्रमात ते प्रमुख उपस्थित म्हणून बोलत होते.
कोल्हापूर : कोल्हापुरातील विधानसभेच्या १० जागांपैकी सद्य:स्थितीत सेनेचे सहा आमदार आहेत. त्यांत वाढ करून दहा आमदार निवडून आणणे एवढेच लक्ष्य आपल्यापुढे आहे, असे प्रतिपादन शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी केले. शिवसेनेच्या वतीने केशवराव भोसले नाट्यगृहात बहिणींसाठी मोफत हेल्मेट वाटप या कार्यक्रमात ते प्रमुख उपस्थित म्हणून बोलत होते.
खासदार कीर्तिकर म्हणाले, राजेश क्षीरसागर यांनी हेल्मेट वाटपाचा हा राज्यातील एकमेवाद्वितीय कार्यक्रम हाती घेतला आहे. नावीन्यपूर्ण कामगिरी करीत त्यांनी सलग दोन वेळा आमदारकी जिंकली आहे. यात प्रथम छत्रपती घराण्यातील मालोजीराजे यांना पराभूत केले, तर मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारावर मात केली आहे. त्यात आज पक्षात सुनील मोदी हेही आले आहेत.
ही बाबही मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवेन. अशा प्रकारे आमचे आमदार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे येत्या काळात विधानसभेच्या १० पैकी १० जागा जिंकणे एवढेच लक्ष्य असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातून राजेश क्षीरसागर यांच्या रूपाने मंत्रिपद देण्यासाठी पक्षप्रमुखांकडे विनंती केली जाईल. त्याची दखल घेऊन ते योग्यवेळी मंत्रिपदासाठी संधी आल्यानंतर नाव सुचवतील.
संपर्क नेते अरुण दुधवडकर म्हणाले, कोल्हापूरची जनता जाणती आहे. त्यामुळे राजेश क्षीरसागर यांच्या रूपाने दोन वेळा सेनेला निवडून दिले आहे. यावेळी माजी महापौर मारुतीराव कातवरे, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, जिल्हा शिवसेनाप्रमुख मुरलीधर जाधव, पवन जाधव, आदींनी मनोगत व्यक्त केले.
हेल्मेट वाटपाला महापौरांची उपस्थिती
पक्षीय कार्यक्रमामुळे सर्व नेते मंडळींची दोन तास भाषणबाजी झाल्यानंतर अखेरीस महापौर हसिना फरास यांनी हेल्मेट वाटप कार्यक्रमास उपस्थिती लावली. त्याची चर्चा उपस्थितांमध्ये होते. त्यांच्या हस्ते काही महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात हेल्मेट वाटप करण्यात आली.
शिवसेनेचे दुर्भाग्य
शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रात एकही नेता नाही. त्यात राजेश क्षीरसागर हे स्वत:च्या हिमतीवर दोन वेळा आमदार म्हणून जनतेतून निवडून आले आहेत. त्यांना मंत्रिपद का दिले जात नाही? हे एक प्रकारे सेनेचे दुर्भाग्य आहे, असे मत माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी मांडले. मी स्वत: कॉँग्रेसचा आहे. तरीही क्षीरसागर माझे मित्र म्हणून या ठिकाणी ही मागणी मी केली आहे. तिचा विचार शिवसेनेतील पदाधिकाºयांनी करावा, अशी विनंतीही इंगवले यांनी केले.
मी शिस्तबद्ध सैनिक
इंगवले यांच्या मागणीनंतर आमदार क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात मी एक साधा शिस्तबद्ध शिवसैनिक आहे. मला बाळासाहेबांमुळे दोन वेळा आमदारकी मिळाली आहे. मी समाधानी असून इंगवले यांनी ही मागणी मित्रप्रेमापोटी व्यक्त केली आहे, असेही स्पष्ट केले.
युवा सेनेत अनेकांचा जाहीर प्रवेश
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांचा बालेकिल्ला असलेल्या तटाकडील तालीम मंडळाचे गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष विश्वदीप साळोखे यांनी युवा सेनेत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश म्हणजे एक प्रकारे जाधव यांना शह दिल्याचे मानले जात आहे. यासह योगेश चौगुले (खंडोबा तालीम), अजिंक्य चौगुले (जुना बुधवार पेठ तालीम), विश्वजित चव्हाण (अध्यक्ष, गंगावेश तालीम), अजिंक्य साळोखे (बालगोपाल तालीम, गणेशोत्सव समिती अध्यक्ष), गुरू लाड (अध्यक्ष, रंकाळवेश तालीम), अविनाश पाटील, अवधूत घाटगे (हिंदू प्रतिष्ठान मर्दानी खेळाचा आखाडा), ओंकार तोडकर यांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.