माफक शुल्कात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणे हेच ध्येय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:29 AM2021-08-18T04:29:52+5:302021-08-18T04:29:52+5:30
कसबा बावडा : कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील बहुसंख्य विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील असून या सामान्य मुलांना कमीत कमी शुल्कामध्ये ...
कसबा बावडा :
कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील बहुसंख्य विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील असून या सामान्य मुलांना कमीत कमी शुल्कामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देऊन सक्षम पिढी घडवेणे हे आमचे ध्येय आहे. या ध्येयाची पूर्तता तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या माध्यमातून निश्चितच होईल, असा विश्वास विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी व्यक्त केला. डी. वाय. पाटील ग्रुपच्यावतीने यावर्षीपासून तळसंदे येथे कृषी व तंत्र विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे.
कृषी व तंत्रज्ञान क्षेत्रातील हे नवे विद्यापीठ विद्यार्थ्याला केवळ पुस्तकीज्ञान न देता व्यवहारज्ञानातही पारंगत बनवण्याचा प्रयत्न करेल. येथील विद्यार्थी सक्षम नागरिक बनून देशविकासात महत्त्वाची भूमिका बजावेल, अशा प्रकारचे शिक्षण त्यांना दिले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. डॉ. पाटील म्हणाले की, बाजारपेठेची मागणी, व्याप्ती व संधी लक्षात घेऊन या ठिकाणी विविध अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्यक्ष क्लासरूममधील शिक्षणावर ५० टक्के भर दिला जाणार असून ३० टक्के प्रयोगशील शिक्षण व २० टक्के अनुभव शिक्षण अशी अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे.
चौकट :
विविध शाखा एकाच छताखाली
या विद्यापीठाच्या माध्यमातून विविध शाखांमधील शिक्षण एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. एखाद्या विद्यार्थ्याला बी.एस्सी. झाल्यानंतर एम. बीए करायचे असेल, तर त्यास याच विद्यापीठात ते करता येईल.
चौकट : सर्जनशीलतेला पूरक 'ऑक्सिजन झोन'
विविध प्रकारच्या हजारो झाडांनी बहरलेल्या तब्बल २०५ एकरच्या परिसरात हे विद्यापीठ कार्यरत झाले आहे. 'ऑक्सिजन झोन' बनलेला हा परिसर विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेसाठी पोषक ठरणारा आहे. विद्यापीठात अनुभवी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली असून प्रयोगशील व अनुभव शिक्षणाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
चौकट : ४० हून अधिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू
यावर्षी ४० हून अधिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स ॲड इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स ॲड इंजिनिअरिंग (डेटा सायन्स), फूड टेक्नोलॉजी, कृषी अभियांत्रिकी, बीसीए, एमसीए, वाणिज्य (कॉमर्स) शाखेतील बी.कॉम/एम.कॉम ऑनर्स, फायनान्स ॲड अकाउंटीग, इंटरनॅशनल फायनान्स, स्ट्रॅटेजीक फायनान्स, व्यवस्थापन (मॅनेजमेंट) शाखेत ऑनर्स, फायनान्स अँड अकाउंटीग, इंटरनॅशनल फायनान्स, ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड सेल्स, ॲग्रो बिझनेस मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, कला व मानव्यविद्या शाखेमध्ये बी. ए. (माध्यम आणि संप्रेषण), बी. ए. (अर्थशास्त्र), बी. ए. (पत्रकरिता), बी. ए. (लिबरल आर्टस), बी. ए. (मीडिया स्टडीज) आदी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
कोट : विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला वाव मिळावा अशा प्रकारे अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील संशोधनाला अधिक गती येईल. कृषी उत्पादनात वाढ व्हावी व त्याचे मूल्यवर्धन व्हावे यासाठी शेतकऱ्यांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठ पुढाकार घेईल. येथील संशोधन, तंत्रज्ञान व विविध प्रयोगांचा शेतकरी बांधवांना निश्चितच फायदा होईल.
डॉ. संजय डी. पाटील
कुलपती, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे.