गोलपोस्टचा राखणदार--सुरेश जरग

By admin | Published: February 18, 2017 12:34 AM2017-02-18T00:34:09+5:302017-02-18T00:34:09+5:30

सुरेशची गोलकिपर या प्लेसची झलक तमाम प्रेक्षकांना पाहता आली

Goalpost Guard - Suresh Jarg | गोलपोस्टचा राखणदार--सुरेश जरग

गोलपोस्टचा राखणदार--सुरेश जरग

Next

सुरेश जरगला कोल्हापूरचे फुटबॉल रसिक जिद्दी गोलरक्षक म्हणून ओळखतात. महाविद्यालयीन स्तरावरील सर्व स्पर्धा त्याने गाजवल्या. शिवाजी मंडळाकडून गोलरक्षक तर कधी फॉरवर्ड या जागेवर त्याने आपले कौशल्य दाखवले.
सुरेश बापूसाहेब जरग याचा जन्म ९ मे, १९५४ रोजी झाला. शिवाजी पेठेतील, खंडोबा तालीम परिसरात तो रहात असे. सुरेशला लहानपणापासूनच फुटबॉल खेळाची आवड होती. मोठयांचा खेळ पाहून फुटबॉल खेळाची आवड निर्माण झाली. लहान मुलांच्या क्लबमधून टेनिस बॉलने तो खेळत असे. ४ फुट ११ इंच उंचीच्या मापाच्या स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली. पद्मा गार्डन मैदान, शिवाजी मराठा हायस्कूल मैदान, प्रिन्स शिवाजी व गांधी मैदान या क्रीडांगणावर या स्पर्धा मोठया इर्षेने होत असत. या स्पर्धेत खंडोबा तालमीचा गोलकिपर म्हणून तो जिगरबाज काम करत असे. त्यामुळे त्याच्यावर गोलकिपर म्हणून कायमचे शिक्कामोर्तब झाले.घराण्यात फुटबॉलचा वारसा नसतानाही गोलकिपर म्हणून सुरेशने आपली कारकिर्द घडवली. गोलकिपिंगमधल्या सर्व तांत्रिक बाजू त्याला अवगत होत्या. सुरेशची बॉल पकडण्याची लकब गतिमान व चपळ होती. सुरेशने अनेक सामन्यात पेनल्टी स्ट्रोक तटवून सामने जिंंकून दिले आहेत. कोल्हापूर हायस्कूलमध्ये असताना सुरेशला राज्य शालेय स्पर्धेत संधी मिळाली नाही. शालेय स्तरावरही सुरेशने गोलकिपिंगचे काम नजरेत भरण्याइतपत चांगले केले होते. मात्र त्याचा शालेय संघ शहर स्तराच्या बाहेर न गेल्याने पुढे त्याला गती मिळाली नाही.सुरेश शालेय शिक्षण पूर्ण करून स्थानिक गोखले कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. लवकरच त्याला गोखलेच्या फुटबॉल संघात गोलकिपरचे स्थान मिळाले. कै.बाळासाहेब खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची बांधणी भक्कम झाली होती. याच संघाचा गोल पोस्टचा रखवालदार सुरेश जरग नावारूपाला येत होता. त्याकाळी कोल्हापूर जिल्हा महाविद्यालयीन सामने (विभागीय) व कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या झोनमध्ये आंतर विभागीय सामने होत असत. या सामन्यात बहुतांशवेळा गोखले कॉलेजचा संघ अजिंंक्य राहात असे. या तीन वर्षाच्या कालावधीत सुरेशची गोलकिपर या प्लेसची झलक तमाम प्रेक्षकांना पाहता आली. सुरेशने शिवाजी विद्यापीठ संघात वेस्ट झोन सामन्याकरिता एकवेळ प्रतिनिधित्व केले होते. कॉलेज स्तरावरील सुरेशच्या आठवणीतील एक सामना असा झाला. गोखले कॉलेज विरूध्द न्यू कॉलेज या दोन अव्वल संघादरम्यान कऱ्हाड येथे इंटर झोन सामना सुरु होता. कराडच्या फुटबॉलप्रेमी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. गोखलेने हाफ टाईमपर्यंत एक गोलची आघाडी घेतली होती. सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी होती. न्यू कॉलेजला गोखले विरूध्द पेनल्टी स्ट्रोक मिळाला. जिद्दी गोलकिपर सुरेशने चित्त्याच्या चपळाईने डाईव्ह टाकून बॉल तटवला व सामना जिंकून सामन्याचा व कराडवासियांचा हिरो बनला.
कॉलेज स्तरावर खेळतानाच समांतर शिवाजी तरूण मंडळ ब संघात गोलकिपर तर कधी फॉरवर्ड या जागेवर समावेश झाला. जनार्दन सूर्यवंशी, शरद मंडलिक, विश्वास कांबळे, आप्पासाहेब वणिरेसर यांचे बहुमोल मार्गदर्शन व प्रेरणा सुरेश विसरत नाही. सुरेश ब संघातून अ संघात आला. गोलकिपर म्हणून स्थानिक सर्व स्पर्धा खेळून आपले नाव कोल्हापूरच्या रसिक प्रेक्षकांच्या हृदयात कोरले. सांगली, मिरज, गडहिंग्लज, गारगोटी, पुणे, मुंबई या ठिकाणी त्याने आपल्या गोलकिपिंगचे चांगले प्रदर्शन केले. सुरेश १९७५ ते १९८५ सलग दहा वर्षे फुटबॉल खेळला.
फुटबॉल खेळामुळे अनेक मित्र मिळाले. अनेक फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्याचा मान मिळाला. बाळासाो खापरे चषक, उमेश सरनाईक स्पर्धा,शिवाजीराव चव्हाण स्पर्धा या आखिल भारतीय स्तरावरील स्पर्धांच्या आयोजनात त्याचा सहभाग होता. मैत्रीला जागणारा. सामान्यावेळी सभ्यतेने व रेफ्रीचे आदेश मानणारा हा खेळाडू. ---प्रा. डॉ. अभिजित वणिरे

 

Web Title: Goalpost Guard - Suresh Jarg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.