गोव्यातील महिला डॉक्टर ‘एसआयटी’च्या ताब्यात

By admin | Published: September 14, 2016 01:26 AM2016-09-14T01:26:28+5:302016-09-14T01:26:41+5:30

विनय पवारच्या पत्नीचा जबाब नोंदविला

In Goa's custody, the women's doctor, SIT | गोव्यातील महिला डॉक्टर ‘एसआयटी’च्या ताब्यात

गोव्यातील महिला डॉक्टर ‘एसआयटी’च्या ताब्यात

Next

कोल्हापूर : पनवेल येथील ‘सनातन’ आश्रमात सापडलेल्या नार्कोटिक औषधांच्या साठ्याप्रकरणी ‘एसआयटी’ने गोवा आश्रमातील महिला डॉक्टर आशा ठक्कर हिला ताब्यात घेतले आहे. ती वीरेंद्र तावडेच्या सांगण्यावरून आश्रमातील ‘खास’ साधकांना औषधे देत होती. त्यामुळे तिला पानसरे हत्येसंबंधी माहिती असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिस तिच्याकडे कसून चौकशी करीत आहेत.
तावडेचे बेपत्ता विनय बाबूराव पवारशी घनिष्ठ संबंध होते. पानसरे यांच्या हत्येपूर्वी पवार हा परिसरात संशयितरीत्या फिरत असताना त्याला स्थानिक चार लोकांनी पाहिले आहे. त्यामुळे पोलिसांनी पवारची पत्नी श्रद्धा पवार हिचा जबाब घेतला. तिने २००९ च्या मडगाव-गोवा बॉम्बस्फोटापासून पती बेपत्ता असल्याचे सांगितले, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.
संशयित तावडे याच्या चौकशीमध्ये परिस्थितिजन्य पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तावडेची बेपत्ता काळ्या रंगाची बॉक्सर कोल्हापुरात खरेदी केल्याचे उघडकीस आल्याने तिचा शोध घेण्याचे काम पोलिस करीत आहेत. वाशिम येथून तावडेची चारचाकी ट्रॅक्स पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मडगाव-गोवा येथे २००९ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी रुद्रगौंडा पाटील, सारंग अकोळकर, प्रवीण लिमकर, जयप्रकाश हेगडे व विनय पवार यांनी या ट्रॅक्सचा वापर केला होता. बॉम्बस्फोटाची रंगीत तालीम घेण्यासाठी ते इचलकरंजीहून जतला गेले होते. त्या ठिकाणी प्रात्यक्षिक घेऊन त्यांनी मडगाव येथे बॉम्बस्फोट घेऊन आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या ट्रॅक्सचा वापर पानसरे यांच्या हत्येसाठी करण्यात आल्याचे तपासात पुढे आले. पनवेल येथील ‘सनातन’ आश्रमामध्ये मिळून आलेल्या नार्कोटिक औषधांचा साठ्याची कसून चौकशी सुरू आहे. ही औषधे गोवा आश्रमातील डॉ. आशा ठक्कर हिच्या सांगण्यावरून साधकांना दिली जात होती. त्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू ठेवली आहे.
श्रद्धा पवारचा जबाब
पती विनय पवार हे ‘सनातन’चे कट्टर साधक होते. आम्ही उंब्रज (जि. सातारा) येथे राहत होतो. आमचे लग्नही पनवेल येथील आश्रमात झाले. २००९ पासून पती बेपत्ता आहेत. याबाबत ‘सनातन’च्या साधकांसह वीरेंद्र तावडेकडे चौकशी केली होती; परंतु त्यांनी काहीच माहिती दिली नाही. मडगाव बॉम्बस्फोटासंबंधी पोलिस घरी चौकशीसाठी आल्यानंतर मी माहेरी निघून आले. उंब्रज येथे त्याचे आई-वडील राहत आहेत. त्यांना कोणाचाच आश्रय नसल्याने ते घरदार सोडून आश्रमात राहण्यास निघाले आहेत. बेपत्ता झाल्यापासून पतीचा आपणाला फोन किंवा कोणताही निरोप नसल्याचे तिने सांगितले. त्यावर पोलिसांनी पतीची बेपत्ता वर्दी पोलिस ठाण्यात का दिली नाहीस, अशी विचारणा केली असता भीतीपोटी दिली नसल्याचे तिने सांगितले. तिने दिलेल्या जबाबाची खात्री केली जात आहे. ती पोलिसांपासून माहिती लपवीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.


तावडेला शहरात आठ
ठिकाणी फिरविले
तावडे याचे कोल्हापुरात वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य होते, अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला बंद गाडीतून इचलकरंजी, कोल्हापुरातील साइक्स एक्स्टेंशन, गंगावेश, वारणानगरसह अन्य ठिकाणांच्या घटनास्थळी फिरवून माहिती घेतली. त्या ठिकाणी असलेल्या काही लोकांचेही जबाब घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.



विनय पवार
तिसरा संशयित
पोलिसांनी आतापर्यंत बारा साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. त्यांना फरार आरोपी सारंग अकोळकर व विनय पवार यांचे फोटो दाखविले असता चार साक्षीदारांनी पवार हा पानसरे राहत असलेल्या परिसरात संशयितरीत्या फिरत असताना आम्ही पाहिले असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे पानसरे हत्येप्रकरणात समीर गायकवाड, वीरेंद्र तावडेसह तिसरा संशयित म्हणून विनय पवार याचे नाव पोलिसांनी रेकॉर्डवर घेतले आहे.

Web Title: In Goa's custody, the women's doctor, SIT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.