पाच मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत बकरी ईदची नमाज पठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 07:41 PM2020-08-01T19:41:15+5:302020-08-01T19:43:00+5:30
दसरा चौक येथील ऐतिहासिक मुस्लिम बोर्डिंगच्या पटागणांवर शनिवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करीत केवळ पाच मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत बकरी ईदची नमाज पठण करण्यात आली. मौलाना मुबिन बागवान यांनी ईदची नमाज आणि खुतबा पठण केले.
कोल्हापूर : दसरा चौक येथील ऐतिहासिक मुस्लिम बोर्डिंगच्या पटागणांवर शनिवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करीत केवळ पाच मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत बकरी ईदची नमाज पठण करण्यात आली. मौलाना मुबिन बागवान यांनी ईदची नमाज आणि खुतबा पठण केले.
या नमाजनंतर संपूर्ण जगातून आणि भारतातून कोरोनाला हद्दपार कर आणि समस्त मानवजातीला कोरोनापासून मुक्ती देण्यासाठी व देशाची प्रगती आणि एकमेकांमध्ये बंधुभाव वाढीस लागू दे, अशी प्रार्थना अल्लाहकडे करण्यात आली.
दरवर्षी बकरी ईदनिमित्त राजर्षी शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या ऐतिहासिक मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर नमाज पठण व एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी ओसंडून जाते. यंदा मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने केवळ पाच मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत नमाज पठण करण्यास परवानगी दिली होती.
त्यानुसार देशाच्या प्रगती व महामारीतून संपूर्ण देशातील बांधवांसह जगातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहू दे व ज्या आरोग्य कर्मचारी, पोलिसांनी या काळात कार्य केले आहे आणि करीत आहेत, त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी दुवा मागण्यात आली.
यानिमित्त मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी बकरी ईदची दावत न करता गोरगरीब लोकांना मदत करा; मास्कचा वापर करून, सामाजिक अंतर ठेवून आपली नित्य कामे करीत रहा, आपल्या घरी राहा - सुरक्षित राहा, असे आवाहन केले. यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादरभाई मलबारी यांनी आभार मानले.