कोल्हापूर: आदमापुरात बकरी भुजविणे व लेंढीपूजनाचा धार्मिक कार्यक्रम उत्साहात, नेमकी प्रथा काय? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 02:39 PM2022-10-26T14:39:25+5:302022-10-26T14:43:57+5:30
रात्री शाहीर सत्यवान गावडे यांनी धनगरी ओवीगायन केले तर धनगर समाजबांधवांनी ढोल-कैताळांच्या तालावर धनगरी गीते गाऊन रात्र जागवली.
बाजीराव जठार
वाघापूर : भंडाऱ्याच्या उधळणीत व ढोल कैताळाच्या गजरात श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील मरगुबाई मंदिराशेजारी असलेल्या बाळूमामांच्या बक-यांच्या तळावर मोठ्या भक्तीमय वातावरणात लेंढीपूजन व बकरी भुजविण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला. बाळूमामांनी दीपावली पाडव्याच्या दिवशी आपल्या मेंढ्यांची पूजा करण्याची प्रथा सुरु केली होती ती प्रथा भाविकभक्तांनी आजही जोपासली आहे.
रात्री शाहीर सत्यवान गावडे यांनी धनगरी ओवीगायन केले तर धनगर समाजबांधवांनी ढोल-कैताळांच्या तालावर धनगरी गीते गाऊन रात्र जागवली. सकाळी बाळूमामांच्या बक-यांच्या लेंढ्यांची रास करुन राशीला ऊस, कर्दळ, केळी उभी करुन विविध रंगाच्या फुलांच्या माळांनी सजवून या राशीची प्रथम बाळूमामा देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी मनोभावे पूजा केली. लेंढ्यांच्या राशीजवळच एका मातीच्या मडक्यात शेळ्या-मेंढ्यांचे दूध संकलित करुन ते विस्तवावर ठेवले जाते. दुध कुणीकडे व कोणत्या दिशेला ऊतू जाते हे पाहण्यासाठी भाविकभक्तांनी एकच गर्दी केली होती.
दूध ऊतू गेल्यानंतर लगेचच धनगराचे धन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळपातीलच काही बक-यांचे पूजन करुन त्यांना हार-तुऱ्यानी सजवून त्यांच्या पाठीमागे ढोल-कैताळ वाजवून, फटाक्यांची आतषबाजी व भंडा-याची मुक्तहस्ते उधळण करुन त्यांना पळविणेत आले. असा 'बकरी बुजवणे 'कार्यक्रम साजरा केला गेला. यावेळी हजारो भाविकभक्तांनी 'बाळूमामांच्या नावानं चांगभलं' च्या जयघोषात केला. त्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला.
या उत्सवाप्रसंगी सदगुरु बाळूमामा देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, बग्गा नंबर पाचचे कारभारी लक्कापा दुरदुंडे, सर्व मेंढके, सचिव रावसाहेब कोणकेरी, बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय पाटील, गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे, विठ्ठल पुजारी, सर्व सेवक, भक्त व ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.