महिला कैद्यांच्या हातांनी घडविला देव... इको-फ्रेंडली गणेशमूर्ती : बरॅकमध्ये होणार प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:41 AM2018-09-05T00:41:43+5:302018-09-05T00:43:01+5:30
आयुष्यात घडलेल्या चुकीने शिक्षा भोगत असलेल्या कळंबा कारागृहातील महिला कैद्यांचे हात सध्या सुबक आणि आकर्षक अशा इको-फ्रेंडली गणेशमूर्ती साकारण्यात गुंतले आहेत. या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना कारागृहातीलच वेगवेगळ्या बरॅकमध्ये करण्यात
कोल्हापूर : आयुष्यात घडलेल्या चुकीने शिक्षा भोगत असलेल्या कळंबा कारागृहातील महिला कैद्यांचे हात सध्या सुबक आणि आकर्षक अशा इको-फ्रेंडली गणेशमूर्ती साकारण्यात गुंतले आहेत. या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना कारागृहातीलच वेगवेगळ्या बरॅकमध्ये करण्यात येणार असून, पुढील वर्षीपासून या गणेशमूर्ती सर्वसामान्य भाविकांसाठीही उपलब्ध करण्याचा व्यवस्थापनाचा विचार आहे.
कळंबा कारागृहातर्फे कारागृह हे शिक्षागृह नव्हे, तर सुधारगृह आहे, या भावनेतून येथील कैद्यांसाठी अनेक विधायक उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे. येथील विविध उद्योगांतून मिळणारा रोजगार, कैदी व मुलांची गळाभेट हे या उपक्रमशीलतेचाच एक भाग. येथील कैदी गेल्या दोन वर्षांपासून श्री अंबाबाई भाविकांसाठी लाडूप्रसाद बनवितात. आता त्यापुढचे पाऊल टाकत येथील महिला कैद्यांनी गणेशमूर्ती घडविण्यास सुरुवात केली आहे.
भागीरथी महिला संस्थेच्या वतीने काही दिवसांपूर्वी महिला कैद्यांना गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. संस्थेच्या प्रशिक्षकांनी महिलांकडून प्रत्यक्ष मूर्तीही बनवून घेतल्या. या प्रशिक्षणानंतर संस्थेतर्फे गणेशमूर्ती घडविण्यासाठीची माती (बॉम्बे क्ले), गबाळा, रंग असा कच्चा मालही पुरविण्यात आला. खरे तर गणराय साकारण्याचा हातखंडा कुंभारबांधवांचा; पण येथील महिला कैदीही आपल्या कौशल्यगुणांचा वापर करून गेल्या चार-पाच दिवसांपासून गणेशमूर्ती साकारण्यात गुंतल्या आहेत.
कारागृहाच्या आवारातच जवळपास २५ ते ४० गणेशमूर्ती तयार करण्यात येत आहेत. कळंबा कारागृहातही दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. प्रत्येक बरॅकमध्ये एका गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. उपाहारगृहातून वस्तूंची खरेदी करून सुरेख आरास केली जाते. दहा दिवस सकाळ-संध्याकाळ आरती, विविध स्पर्धा व शेवटच्या दिवशी गणेशमूर्ती विसर्जन केले जाते. महिला कैद्यांनी पहिल्यांदाच बनविलेल्या या गणेशमूर्तींची कारागृहाच्या प्रत्येक बरॅकमध्ये प्रतिष्ठापना होणार आहे.
पहिल्या वर्षीच्या या प्रयत्नानंतर पुढील वर्षीपासून मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती तयार करून महिला कैद्यांच्या हातांना काम देण्याचा कारागृह व्यवस्थापनाचा विचार आहे. या मूर्ती सर्वसामान्य भाविकांसाठीही उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
महिला कैद्यांमधील कलाकौशल्याला वाव मिळावा, या प्रयत्नातून त्यांना गणेशमूर्ती घडविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यंदा या गणेशमूर्ती कारागृहातच प्रतिष्ठापित केल्या जातील. पुढील वर्षीपासून मात्र त्या सर्वसामान्य भाविकांना उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.
- शरद शेळके
अधीक्षक, कळंबा कारागृह
कारागृहातून बाहेर पडल्यानंतर या महिलांनाही रोजगाराचे साधन मिळावे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व समाजाने त्यांना सहजरीत्या स्वीकारावे यासाठी संस्था प्रयत्नशील असते. त्या उद्देशातूनच गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भविष्यात त्याची व्याप्ती वाढण्याचा प्रयत्न आहे.
- अरुंधती महाडिक अध्यक्षा, भागीरथी महिला संस्था