कारभार सुधारल्यास गोडवे, अन्यथा जोडे : उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:49 AM2017-11-25T00:49:26+5:302017-11-25T01:01:46+5:30
कोल्हापूर / कोपार्डे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीला व त्या कागदाला या राज्यात काडीचीही किंमत नाही. मग हे सरकार नेमकं कोण चालवतंय.
कोल्हापूर / कोपार्डे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीला व त्या कागदाला या राज्यात काडीचीही किंमत नाही. मग हे सरकार नेमकं कोण चालवतंय. चंद्रकांतदादा पाटील राज्य चालवतात का? असा सवाल करत सर्वच पातळीवर सरकार अपयशी ठरले असून अशावेळी सरकारची आरती ओवाळायची का? चांगला कारभार केला तर तुमचे गोडवे गाऊ, अन्यथा जोडे मारू, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
कुडित्रे (ता. करवीर) येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात ठाकरे यांनी राज्य व केंद्र सरकारच्या कारभाराचे अक्षरश: वाभाडे काढले, कुठे आहेत अच्छे दिन?, १५ लाख सोडा १५ पैसे तरी सामान्यांच्या बँक खात्यात जमा झाले का? असा सवाल करत उद्धव ठाकरे म्हणाले, दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यात फिरत असताना निवेदनांचा पाऊस पडत आहे. वीज, कर्जमाफी, हमीभाव, कीटकनाशक येथे शेतकºयांना मिळत नाही, येथे फक्त त्रास मिळत आहे.
दोन्ही काँग्रेसच्या काळातही संवादयात्रा काढली. त्यावेळच्या व आताच्या परिस्थितीत फरक दिसत नाही. केंद्रीय मंत्री वीज धोरणाबाबत तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीका करत होते, आता काय परिस्थिती आहे. पंतप्रधानांनी ‘सौभाग्य’ योजना आणली, येथे शेतकºयांकडे वीज बिल भरण्यासाठी पैसे नाहीत आणि हे कनेक्शन मोफत देण्यास निघाले आहेत. कर्जमाफीचा तर फज्जा उडाला असून मुख्यमंत्री आकडा फुगवून सांगत आहेत. नोटाबंदीने दहशतवाद मोडला नाही तर वाढल्याचे सांगत ठाकरे म्हणाले, ऊस आंदोलन पेटले आहे, शेतकºयांच्या छातीवर गोळ्या झाडल्या जातात, शेतकºयांचा जीव एवढा स्वस्त झाला का? गोळ्या छातीवर न झाडता पायावर झाडण्याचा सल्ला रावसाहेब दानवे देतात. सत्ताधारी पक्षाचे असले प्रदेशाध्यक्ष असल्याची लाज वाटते.
इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी वीज दरवाढ अर्धी करण्याचा शेरा मारला, पण त्याची अंमलबजावणी झालीच नाही. शेतकºयांना त्रास देऊ नका, अन्यथा तो पिसाळून उठला तर तुमची किंमत दाखवून देईल. हिंदुत्व हे आमचे राष्टÑीयत्व असून त्यासाठीच भाजपसोबत आहोत. केवळ गायीला वाचविण्यासाठी नव्हे, तर शेतकºयांना वाचवणे हे आमचे हिंदुत्व आहे. तिहेरी तलाकचे विधेयक अधिवेशनात आणणार आहात, मग समान नागरी कायदा, राम मंदिराबाबत तुमची भूमिका काय? असा सवालही त्यांनी केला.
मेळाव्याचे संयोजक आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, शेती पंपांना रात्रीच्या वेळी वीजपुरवठा होत असल्याने शेतकºयांचा जीव धोक्यात आला आहे. धामणी प्रकल्पाची सुधारित मान्यता मिळाली पण अद्याप निधी मिळालेला नाही, त्यासाठी प्रयत्न करावेत. कोल्हापुरातून टोल हद्दपार करण्यात करवीरच्या जनतेचा मोठा वाटा असून फक्त पडद्यावर आलो नाही. आभार ‘कुंभी’चे उपाध्यक्ष दादासो लाड यांनी मानले. ‘कुंभी’च्या पहिल्या साखर पोत्याचे पूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संपर्क नेते खासदार गजानन किर्तीकर, खासदार विनायक राऊत, राज्यमंत्री विजय शिवतारे, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, अरुण दुधवडकर, संजय मंडलिक, प्रकाश आबिटकर, सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर, संजय पवार, विजय देवणे, अजित नरके, संजय घाटगे, सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते.
नरकेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन
आमदार चंद्रदीप नरके यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सभेला महिलांसह तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. साखर कारखाना उत्तम चालविल्याबद्दल नरके यांचे कौतुक करीत, जंगली झाडे खूप वाढतात; पण फळे देणारी व कीड न लावणारी झाडे निर्माण केली पाहिजेत, ते काम चंद्रदीप यांनी केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
अपशकुन नको म्हणून पाठिंबा
दोन्ही कॉँग्रेसना कंटाळून जनतेने आम्हाला साथ दिली. त्यामुळे अपशकुन नको म्हणूनच भाजपला पाठिंबा दिल्याचे सांगत लोकसभेला नेमके काय बिनसले आणि युती तोडली हे कळले नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
हार्दिकने गुजरातमध्ये फोडला घाम...
गुजरातमध्ये हवा टाईट आहे. अटीतटीची लढाई आहे. हार्दिक पटेलने तिथे भाजपला घाम फोडला असून, पंतप्रधानांना ५० सभा घ्याव्या लागत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
शरद पवार यांच्यावर निशाणा
शरद पवार यांना चोरून भेटलो नाही, आमचे उघड असते. होय, आम्ही सरकारवर नाराज आहोत; पण परवा तुम्ही मुख्यमंत्र्यांना कशासाठी भेटलात? मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीऐवजी शेतकºयांच्या प्रश्नांसाठी चर्चा केली असतीत तर ते बरे वाटले असते, अशा शब्दांत त्यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला.
मग मागेल ते देतो...
कोल्हापूरकरांकडून खूप अपेक्षा आहेत. महाराष्टÑात शिवसेनेचा मुख्यमंंत्री करण्यासाठी अशीच साथ द्या. मग तुमच्या मनात जे आहे, जे मागाल ते देतो. आम्हाला जे जमते तेच बोलतो, असे सांगत मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूरला संधी देणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले.
‘ईव्हीएम’मध्ये घोटाळा
उत्तर प्रदेशात ‘ईव्हीएम’मध्ये घोटाळा केला, गुजरातमध्ये काय होणार? ही लोकशाही मानायची का? मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली पाहिजे. माझे मत कोणाला दिले गेले हे मतदाराला कळले पाहिजे. त्यासाठी मतपत्रिकेवर मतदान घ्या, असेही ठाकरे यांनी सांगितले.