कोल्हापूरात देवदासींनी काढला सुती-चौंडके मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 05:28 PM2018-12-21T17:28:32+5:302018-12-21T17:29:26+5:30
कोल्हापूर : देवदासी महिलांचे पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्वरित ठोस अनुदानासह योजनांचा लाभ दिला नाही, तर त्या ...
कोल्हापूर : देवदासी महिलांचे पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्वरित ठोस अनुदानासह योजनांचा लाभ दिला नाही, तर त्या पुन्हा हातात चौंडकं घेऊन पोटाची खळगी भरतील, असा इशारा राज्य सरकारला देत देवदासींनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सुती चौंडक मोर्चा काढून निषेध नोंदविला.
दुपारी एकच्या सुमारास खानविलकर बंगला परिसर येथून नेहरू युवा देवदासी विकास मंडळाच्या माध्यमातून देवदासींच्या मोर्चाला सुरुवात झाली. हातात चौंडकं घेऊन ते वाजवत महिला मोर्चाच्या पुढे होत्या.
पाठीमागे देवदासी महिला घोषणाबाजी करीत आमच्या मागण्या मान्य करा..., देवदासींना दोन हजार रुपये पेन्शन मंजूर करावी..., निराधार, विधवा देवदासींचा अंत पाहू नका... असे फलक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्या. या ठिकाणी जोरदार घोषणा देत तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी चौंडक्याच्या आवाजाने परिसर दुमदुमला. या अभिनव आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले.
आंदोलनात माजी नगरसेवक अशोेक भंडारे, माजी नगरसेविका मायादेवी भंडारे, शारदा पाटोळे, शांताबाई पाटील, रेखाताई वडर, देवाताई साळोखे, छाया चित्रुक, आदींसह देवदासी सहभागी झाल्या होत्या.