गोधडीने दिली आत्मसन्मानाची ऊब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:17 AM2021-04-29T04:17:47+5:302021-04-29T04:17:47+5:30
कोल्हापूर : घराघरातल्या आजीने शिवलेली गोधडी अंगावर घेतली की तिच्या हाताचा स्पर्श आणि मायेची ऊब आपल्या आठवणींचा कोपरा अधिक ...
कोल्हापूर : घराघरातल्या आजीने शिवलेली गोधडी अंगावर घेतली की तिच्या हाताचा स्पर्श आणि मायेची ऊब आपल्या आठवणींचा कोपरा अधिक सुगंधित करते. आता ही गोधडी नवं रूप घेऊन घराच्या सौंदर्यात भर पाडत आहे. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनने कुटुंबांची बिघडलेली आर्थिक स्थिती, नैराश्य या गोष्टींवर मात करत गरजू महिलांना या गोधडीने आत्मसन्मानाची ऊब दिली आहे. संस्कार शिदोरीच्या माध्यमातून तयार झालेल्या या गोधड्यांना अन्य राज्यातून मागणी येत आहे.
कोल्हापुरातील स्मिता खामकर या इनरव्हील क्लबसह विविध सामाजिक संस्थांशी निगडित आहेत. नवनवीन संकल्पना राबवण्यात हातखंडा असलेल्या स्मिता यांना ८ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना आर्थिक स्वावलंबन देणारा उपक्रम सुरू करायचा होता. गेल्या वर्षभरात कोरोना आणि लॉकडाऊनने अनेक गरजू कुटूंबांची आर्थिक घडी विस्कटली आहे. कर्त्या पुरुषांचा कामधंदा, नोकरी गेली, तर कुणाला कोरोनाने हिरावून नेले. अशा महिलांसाठी काही करावे या धडपडीतूनतून संस्कार शिदोरी हा गोधडी शिवण्याचा प्रकल्प आकाराला आला.
सध्या ग्रामीण भागात अजूनही जुन्या वापरलेल्या घराघरात गोधडी शिवली जात असली तरी शहरात हे प्रमाण कमी झाले आहे. अनेकांना तर गोधडी म्हणजे काय हे देखील माहीत नसते. गोधडीतून मिळणारी मायेची ऊब प्रत्येकाला आपल्या बालपणात घेऊन जाते, त्याच्याशी मनाचा हळवा कोपरा जोडलेला असतो. गोधडीच्या या परंपरेला आधुनिक टच देत नवीन कापडापासून गोधडी बनविण्यास सुरुवात झाली. ती अधिक ग्लोबल करण्यासाठी त्याचा लूक, फिनिशिंगमध्ये बदल करण्यात आले आणि गोधडी नव्या रुपात आणि नव्या दिमाखात आकाराला येऊ लागली.
यासाठी २० गरजू महिलांना गोधडी कशी शिवायची याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना वेगवेगळे डिझाईन दाखवून त्यांच्याकडून बनवून घेतले. आता महिला या शिलाईत तरबेज झाल्यानंतर गोधड्या बनवायला सुरुवात झाली. तेवढ्यात पुन्हा संचारबंदी आणि लाॅकडाऊन सुरू झाल्याने त्याचे मार्केटींग फेसबुकसारख्या समाज माध्यमावरून केले. याला इतका भरभरून प्रतिसाद मिळाला आहे की अन्य राज्यातूनही ऑर्डर आल्या आहेत.
---
बाळाच्या दुपट्यापासून कार्पेटपर्यंत
या गोधडीतही विविध प्रकार आहेत. नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या मऊदार दुपट्यापासून ते हॉल, किचनमध्ये अंथरायच्या कार्पेटचा आकार, सिंगल-डबल बेडवर घालायची गोधडी, दुपट्टा पॅटर्न अशा वेगवेगळ्या आकारात आणि डिझाईनमध्ये या गोधड्या उपलब्ध आहेत.
---
धाव टाक्यानेच शिलाई..
ही गोधडी शिवताना मधल्या मुख्य डिझाईनचे कापड मशीनवरील शिलाईने जोडले जाते, एकदा तो आकार तयार झाला की मग हाताने उभे आडवे धाव टाके घातले जातात. ही गोधडी दिसायलाही आकर्षक असते आणि धाव टाक्यामुळे तिचा पारंपरिक बाजही जपला जातो.
----
आपली पारंपरिक कला असलेली गोधडी घराघरात थाटाने वापरली जावी व या आपत्तीच्या काळात महिलांना कायमचा रोजगार मिळावा हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. पुढील दोन महिन्यांत किमान ५० महिलांना यातून रोजगार देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
स्मिता खामकर
--
फोटो नं २८०४२०२१-कोल-गोधडी०१,०२
--