देवाच्या दारी रुग्णांच्या असहाय्यतेची वाटमारी फसवणुकीचा फंडा : दादा... तुम्हाला काय हो झालंय हे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:23 AM2021-02-12T04:23:35+5:302021-02-12T04:23:35+5:30
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरच काय नृसिंहवाडीपासून महाराष्ट्रातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी रुग्णांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन बोगस औषधाच्या नावाखाली देवाच्या दारातच ...
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरच काय नृसिंहवाडीपासून महाराष्ट्रातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी रुग्णांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन बोगस औषधाच्या नावाखाली देवाच्या दारातच वाटमारी सुरु असल्याचे उघड झाले आहे. ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त १० फेब्रुवारीला प्रसिध्द केल्यानंतर असाच प्रकार आपल्या बाबतीतही घडल्याचे अनेक लोकांचे फोन आले.
मंदिरात तुम्ही लंगडत जाताना पाहिले की, एजंट तुम्हाला नक्कीच गाठतो. अपंगत्व, त्वचेचे आजार, डोक्यावर कमी केस अशा बाह्य तक्रारी दिसणाऱ्या व्यक्तिंनाच हेरले जाते. ‘दादा, तुम्हाला काय हो झालंय हे...’ असे म्हणत आस्थेने विचारपूस केली जाते. हे आमच्याही वडिलांना झाले होते. त्यांना खूप त्रास होता... आम्ही बघा... इचलकरंजीजवळच्या धनगरी बाबांकडून औषध आणले आणि गुण आला. आता ते पाच किलोमीटर रोज चालतात, असे सांगून जाळ्यात ओढले जाते. कोल्हापुरातील जाहिरात एजन्सीशी संबंधित कुटुंबालाही असाच अनुभव जयसिंगपूरमध्ये आला. तिथे एका चौकात भडंग घ्यायला ते थांबले होते. त्यांच्या पतीला त्वचारोगाचा त्रास होता. एजंटाने सांगितले की, आमच्या भावालाही असाच त्रास होता. त्यामुळे बहिणींची लग्ने ठरत नव्हती. आम्ही त्या बाबाकडून मलम आणले आणि त्रास बंद झाला. फोन करून दोन दिवसांत तो एजंट त्यांच्या घरापर्यंत आला. घरी आल्यावर २ किलो खोबरेल तेल, २५ गुलाब, आणि २५ ग्रॅमचा काढा गॅसवर उकळलायला लावला. ५ नारळ देवाजवळ ठेवायला लावले. काढा उकळल्यावर त्यात थोडी आयुर्वेदिक औषधे घालायला लागतात म्हणून उकळलेल्या तेलाच्या भांड्यासह त्यांना घेऊन कोल्हापुरातील महालक्ष्मी बँकेच्या शेजारच्या इमारतीत घेऊन आला. तिथे आयुर्वेदिक दुकानातील विविध प्रकारची औषधे घ्यायला लावली. त्याचे बिल २० हजार रुपये झाले. हे बिल पाहून संबंधित व्यक्तीच्या पत्नीने आपण एक महिन्याचे दहा हजारांचे औषध घेऊ, असे सुचविल्यावर ‘ताई, तुम्ही आपल्या माणसासाठी दहा हजारांकडे कशाला पाहताय’, असे मानसिक ब्लॅकमेलिंग केले व सर्वच औषधे घ्यायला लावली. खोबरेल तेल असल्याने पंधरा दिवस त्वचा मऊ पडण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही लाभ या औषधाचा झाला नाही. परंतु, त्यांना २० हजारांना गंडा बसला. त्या एजंटाचा फोन नंबर नंतर कायमचाच बंद झाला. साधारणत: फसवणुकीची धाटणी अशी आहे. ज्यांना यातील मेख माहीत आहे, अशा काही जागरुक लोकांनी ‘तुला पोलिसांकडे नेऊ का’, अशी दटावणी दिल्यावर एजंट पसार झाल्याचेही अनुभव आहेत.
लुटीची साखळीच..
अशाप्रकारची फसवणूक व्यक्तिगत पातळीवर होते. ज्याची फसवणूक होते तो त्याबद्दल तक्रार करून प्रकरण धसास लावण्याच्या फंदात पडत नाही. त्यामुळे दिवसभरात रोज एक-दोन लोकांची जरी अशी फसवणूक झाली तरी त्यातून त्यांचा खिसा गरम होतो. औषध दुकानदार व एजंटांची ही भक्कम साखळी असल्याचे दिसते.