शहरातील रस्त्यांवरुन जाताय? सावधान ! खड्ड्यांमुळे वाढू शकते पाठदुखी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:16 AM2021-07-22T04:16:03+5:302021-07-22T04:16:03+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती आधीच बिकट असल्याने विकासकामांसाठी मिळणारा तुटपुंजा निधी लक्षात घेता नवीन पक्के रस्ते करणे सोडाच ...
कोल्हापूर : महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती आधीच बिकट असल्याने विकासकामांसाठी मिळणारा तुटपुंजा निधी लक्षात घेता नवीन पक्के रस्ते करणे सोडाच धड डागडुजी करणेसुध्दा प्रशासनाला अशक्य आहे. दोन पावसाळ्यांत शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब, खड्डेमय झाल्यामुळे नागरिकांना मात्र पाठदुखी, मानदुखीचा त्रास वाढला आहे.
कोल्हापूर शहरातील खराब रस्ते सातत्याने चर्चेत असलेला विषय आहे. नागरिक याविषयी तक्रारी करतात, आंदोलने करतात. पण निधीच नसल्यामुळे या रस्त्यांची डागडुजीसुध्दा करता येत नाही, हे वास्तव आहे. रस्ते करण्याची इच्छा असूनही प्रशासन हतबल आहे. रस्त्यांसाठी अपुरा निधी मिळाला की मग गरजेपुरते तुकडे पाडून रस्ते केले जातात. तुकड्यांची ही पद्धत बंद व्हायला हवी. वर्षातून काही मोजकेच रस्ते घेऊन ते पूर्णपणे नव्याने आणि दीर्घकाळ टिकतील, असे मजबूत केले पाहिजेत. परंतु, याचे भान लोकप्रतिनिधींना राहिलेले नाही.
कोल्हापूर शहराचा इतिहास पाहता, एकदा रस्ता केला की तो पुढील एक-दीड वर्षातच खराब होतो. मग त्यावर केवळ पॅचवर्क केले जाते. पण तेही कमी खर्चाचे असल्याने तकलादूच होते. केवळ महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे शहरातील शेकडो किलोमीटर रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
वाहनांचा खर्च वाढला, पाठदुखीही वाढली -
१. ‘शहरात एकही रस्ता बिनखड्ड्यांचा नाही. त्यामुळे दुचाकीवरुन पाच-सात किलोमीटरचा प्रवास केला की रात्री अंंगदुखीचा, पाठदुखीचा त्रास होतो’.
- रणजित पाटील, सुर्वे नगर .
२. ‘पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे खड्डे दिसत नाहीत. दुचाकी खड्ड्यात आदळली की पाठीला दणका बसतो, मान दुखावते. गाड्यांचा दुरुस्ती खर्चही वाढतो.
- रवी शेळके, पोवार कॉलनी.
३. ‘रस्ते इतके खराब झालेत की जो पडेल त्याचे हाड मोडणार. शहरात सतत प्रवास करावा लागत असल्याने भविष्यात नागरिकांना मणकेदुखीचा त्रास होणार हे नक्की’.
- डॉ. संजय वाळके, शिवाजी पेठ.
४. ‘रस्ते केल्यानंतर लगेच ड्रेनेज लाईन, जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदाई केली जाते, ती बंद व्हायला हवी. तुकडे तुकडे रस्ते करण्याची पध्दत बंद व्हायला पाहिजे. रहदारीचे रस्ते अत्यंत मजबूत करायला हवेत. त्यासाठी तेवढा निधीही मिळायला हवा.
- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता.
या रस्त्यांवर गती कमी ठेवलेलीच बरी -
अ. दसरा चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी ते इंदिरा सागर रस्ता.
- निर्मिती साल - २०१०
- झालेला खर्च - २ कोटी
- डागडुजी साल - २०२०
- झालेला खर्च - ४ लाख ५० हजार
ब. बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक ते उभा मारुती चौक रस्ता.
- निर्मिती साल - २०१७
- झालेला खर्च - २० लाख
- डागडुजी साल - २०१९
- झालेला खर्च - ५ लाख
(फोटो देत आहे.)