‘गोखले’च्या बलदंड खेळाडूंना चकवून गोल

By admin | Published: December 13, 2014 12:08 AM2014-12-13T00:08:05+5:302014-12-13T00:15:37+5:30

कोल्हापूरचा फुटबॉल...

Gokhale's stubborn and spin-friendly goals | ‘गोखले’च्या बलदंड खेळाडूंना चकवून गोल

‘गोखले’च्या बलदंड खेळाडूंना चकवून गोल

Next

साधारण १९५१-५८ चा तो काळ होता. त्याकाळी ४ फूट १० इंच उंचीच्या आतील मुलांचे सामने रंकाळ्यावर होत असत. मीही त्यात सहभागी होत असे. यावेळी आमच्या संघात अप्पा वणिरे, रामभाऊ ठकार, विनायक कडेकर, आत्माराम मोहिते, दशरथ नलवडे, संभाजी सरनाईक (गोलकीपर) हे खेळत होते. मीही कमी उंचीचा असल्याने त्यांच्यातून खेळत असे. याचदरम्यान मी मॅट्रिक उत्तीर्ण होऊन राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
मी फुटबॉल चांगला खेळत असल्याने कॉलेजमध्येही मी फुटबॉलपटू म्हणून सर्वांना परिचित होतो. त्यामुळे कॉलेजच्या संघात माझी वर्णी आपोआपच लागली. संघाचा कर्णधार डी. के. अतितकर व मी उपकर्णधार होतो. आमचा सामना गोखले कॉलेजबरोबर होता. तो सुरू झाल्यानंतर ‘गोखले’कडून सखारामबापू व बाळासाहेब खराडे हे बलदंड शरीराचे खेळाडू आमच्यासमोर होते. त्यांचा खेळ म्हणजे रांगडा फुटबॉल खेळ होता. त्यात ते फुलबॅक होते. मी त्यांच्या गोलक्षेत्रात गोल करण्यासाठी गेलो असता, बाळासाहेब व सखारामबापू माझ्या अंगावर पडले. त्यामुळे मी दबला गेलो. पुन्हा मी उठून या सर्वांना चकवून गोल नोंदविला. समोर नंदू शिंदे हाही कसलेला गोलरक्षक होता. तरीही मी गोल केला, असे एक ना अनेक किस्से ‘आठवणीतील फुटबॉल’ सामन्याविषयी प्रॅक्टिस क्लबचे माजी फुटबॉलपटू बाबासाहेब सूर्यवंशी सांगत होते.
आम्ही राहण्यास शिवाजी पेठेतील सरदार तालीम परिसरात होतो. मात्र, मी फुटबॉल मंगळवार पेठेतील त्याकाळच्या प्रॅक्टिस क्लबकडून खेळत असे; कारण माझे मामा त्या ठिकाणी राहत असत.
माझे वडीलही संस्थानकाळात महाराजांच्या टीममधून हॉकी खेळत असत. त्यामुळे मला अ‍ॅथलेटिक्स, फुटबॉल या खेळांची आवड निर्माण झाली. पूर्वीच्या तळ्यात आमचा सामना बाराईमाम तालमीबरोबर होता. त्यात लक्ष्मण पिसे हे अत्यंत चपळाईने चेंडू नेण्यात पटाईत होते. याही सामन्यात मी सेंटरपासून सर्वांना चकवीत गोल केला. तो गोल माझ्या कायम स्मरणात राहिला.
मी १९५१ ते १९५८ सालापर्र्यंत फुटबॉल खेळलो. पुढे १९६० साली पतियाळाच्या क्रीडा विद्यापीठात माझी निवड झाली आणि मी फुटबॉलपटूचा अ‍ॅथलेटिक्सपटू झालो. त्यावेळी आजच्याइतका फुटबॉल खेळ प्रगल्भ झाला नव्हता. मात्र, पेठापेठांची ईर्षा होती. आज सर्व सुविधा आहेत. कोल्हापूरच्या फुटबॉलला इतकी मोठी परंपरा असल्याने कोल्हापूरचे खेळाडू राष्ट्रीय तसेच राज्य संघात सातत्याने चमकायला हवे होते.
शब्दांकन : सचिन भोसले
 

Web Title: Gokhale's stubborn and spin-friendly goals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.