gokukl Result : अंजना रेडेकर यांचा विजय नजरेत भरणारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:57 PM2021-05-04T16:57:21+5:302021-05-04T17:00:55+5:30
GokulMilk Result Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) निवडणूकीत पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधी आघाडीतून विजयी झालेल्या अंजना केदारी रेडेकर यांनी मतमोजणीत सुरुवातीपासूनच निर्विवाद वर्चस्व मिळविले. सत्तारूढ गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नूषा शौमिका महाडिक या विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत झगडत असताना रेडेकर यांचा विजय मात्र नजरेत भरणारा ठरला.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) निवडणूकीत पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधी आघाडीतून विजयी झालेल्या अंजना केदारी रेडेकर यांनी मतमोजणीत सुरुवातीपासूनच निर्विवाद वर्चस्व मिळविले. सत्तारूढ गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नूषा शौमिका महाडिक या विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत झगडत असताना रेडेकर यांचा विजय मात्र नजरेत भरणारा ठरला.
रेडेकर यांचे माहेर गडहिंग्लज तालुक्यातील कौलगे. त्यांचे सासर आजरा तालुक्यातील पेद्रेवाडी. त्यांचे पती केदारी रेडेकर हे शिवसेनेचे हार्डकोअर कार्यकर्ते होते. मुंबईचे ते नगरसेवक होते. त्यांच्या निधनानंतर अंजना रेडेकर राजकारणात आल्या. त्या जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या. आजरा साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
शिवसेना-भाजप युतीचे सरकार राज्यात १९९५ ला सत्तेत असताना त्यांना गडहिंग्लजला वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. त्याशिवाय आता त्यांनी इंग्रजी माध्यमाची शाळाही सुुरु केली आहे. गेल्या निवडणूकीत सर्वसाधारण गटातून लढून त्यांनी १२४६ मते मिळवली होती. गोकूळची निवडणूक ठरावधारकांच्या हातात असते. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधून सगळ्या जोडण्या लावल्याने व त्यांना आघाडीतूनही पालकमंत्री सतेज पाटील यांचे मोठे पाठबळ मिळाल्याने विजयाचा गुलाल मिळाला. गोकुळ संघर्ष समितीच्या कार्यकर्त्या म्हणूनही त्या पाच वर्षे सक्रीय होत्या.