निवडणूक स्थगितीसाठी गोकुळ पुन्हा उच्च न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 10:10 AM2021-03-06T10:10:45+5:302021-03-06T10:14:33+5:30
Gokul Milk Election Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) निवडणूक प्रक्रियेला स्थगिती द्यावी, यासाठी उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली आहे. शासनाच्या २४ फेब्रुवारीच्या निवडणूक स्थगितीच्या आदेशालाच त्यांनी आव्हान दिले असून यावर सोमवारी (दि. ८) सुनावणी होणार आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) निवडणूक प्रक्रियेला स्थगिती द्यावी, यासाठी उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली आहे. शासनाच्या २४ फेब्रुवारीच्या निवडणूक स्थगितीच्या आदेशालाच त्यांनी आव्हान दिले असून यावर सोमवारी (दि. ८) सुनावणी होणार आहे.
राज्य शासनाने कोविडच्या रुग्णात वाढ होत असल्याने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना २४ फेब्रुवारी रोजी स्थगिती दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहिली. आदेशाबाबत स्पष्टीकरण मिळावे, यासाठी गोकुळने याचिका दाखल केली होती. मात्र, सुनावणीनंतर ती मागे घेतली. तोपर्यंत प्रारूप यादीवरील हरकतीवर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली.
पुन्हा गोकुळने उच्च न्यायालयाच याचिका दाखल करत निवडणूक प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी केली. शासनाच्या २४ फेब्रुवारीच्या आदेशाला आव्हान दिले असून, या स्थगितीमधून ह्यगोकुळह्णला वगळू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. शासनाच्या वतीने विभागीय सहनिबंधक मुंबई बाजीराव शिंदे, तर प्राधिकरणाच्या वतीने विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांना प्राधिकृत केले आहे.
शासनाच्या भूमिकेवरच निवडणुकीचे भवितव्य
राज्य शासनाच्या आदेशाला आव्हान दिल्याने आता त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. शासन नेमके म्हणणे काय मांडणार, यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
इतर संस्थांवर परिणाम नाही
न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात ४१ सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या. त्यापैकी २१ संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. वीस संस्थांमध्ये गोकुळचा समावेश आहे. निवडणूक नको म्हणून ह्यगोकुळह्ण जरी न्यायालयात गेले असले तरी त्या निकालाचा परिणाम उर्वरित संस्थांवर होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
गोकुळने यांना केले प्रतिवादी....
- राज्य शासन
- सहकार आयुक्त, विभागीय उपनिबंधक (दुग्ध)
- सहायक निबंधक (दुग्ध)
गोकुळ हरकतींवरील निकालाबाबत उत्सुकता
गोकुळ दूध संघाच्या प्रारूप यादीवरील हरकतींची सुनावणी पूर्ण झाली. आक्षेपांमध्ये अनेक गमतीजमती समोर आल्याने निकालाबाबत संस्थांमध्ये उत्सुकता आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर हे निकाल देणार आहेत.
गोकुळच्या यादीवर ७१ हरकती आल्या होत्या. त्यातील ३५ हरकती या दुबार ठरावांवर होत्या. सुनावणीदरम्यान १४ जणांनी माघार घेतली, तर तीन तक्रारदार गैरहजर राहिल्याने १८ दुबार ठरावधारकांचे म्हणणे दाखल झाले. यामध्ये सासू मृत झाल्यानंतर दोन्ही सुनांनी ठरावावर दावा केला आहे.
आता अधिकृत ठरावधारक सून कोण? हे शोधण्याचे काम दुग्ध विभागाला करायचे आहे. अशा गमतीजमती सुनावणीदरम्यान समोर आल्या आहेत. दोन संचालक मंडळ उपस्थित करून ठरावाला आव्हान दिले आहे. सहा संस्थांचे ठरावच बदला, अशी मागणी राधानगरीतील एकाने केली आहे. यासह इतर हरकतींवर दुग्ध विभाग काय निकाल देतो, याबाबत उत्सुकता लागली आहे.
निवडणुकीबाबत गोकुळने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी आहे. मात्र दुग्ध विभाग नियोजित वेळापत्रकानुसार सकाळी अकरा वाजताच निकाल देऊ शकतो. निकालाचा परिणाम अंतिम यादीवर होऊ शकतो.