‘गोकुळ’मध्ये आतातरी सत्तारूढ गटाबरोबरच

By admin | Published: March 29, 2015 11:54 PM2015-03-29T23:54:29+5:302015-03-30T00:12:20+5:30

राष्ट्रवादीच्या बैठकीत सूर : निर्णय ५ एप्रिलला होणार; ‘केडीसीसी’बाबत काँग्रेसशी आघाडीचे संकेत

In the 'Gokul' alone, with the ruling group | ‘गोकुळ’मध्ये आतातरी सत्तारूढ गटाबरोबरच

‘गोकुळ’मध्ये आतातरी सत्तारूढ गटाबरोबरच

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघामध्ये (गोकुळ) सत्तारूढ गटाबरोबर चर्चा सुरू असून सन्मानजनक जागा दिल्या तर त्यांच्याबरोबर जाऊ, अन्यथा पुढील दिशा ठरविली जाईल, याबाबत ५ एप्रिलला निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत झाली. ‘केडीसीसी’बाबत काँग्रेसशी आघाडी करण्याचे संकेतही या बैठकीत देण्यात आले.
रविवारी सायंकाळी सहा वाजता शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये ‘गोकुळ’ व ‘केडीसीसी’ बँकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. ‘गोकुळ’ निवडणुकीत सत्तारूढ गटाबरोबर जावे यासाठी काही ज्येष्ठ नेत्यांचा आग्रह राहिला तर काहीजणांचा विरोधी गटांबरोबर जावे, असे मत होते. त्यावर सत्तारूढ गटाचे नेते आमदार महादेवराव महाडिक यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. त्यांच्याकडे चार जागांची मागणी केली असून सन्मानजनक जागा दिल्या, तर सत्तारूढ गटाबरोबर जाण्याची तयारी प्रमुख नेत्यांनी बैठकीत दर्शविली. ५ एप्रिलला सत्तारूढ गटाबरोबर अंतिम चर्चा केली जाणार असून त्याच दिवशी पक्षाची भूमिका जाहीर केली जाईल, असे नेत्यांनी बैठकीत सांगितल्याचे समजते.
जिल्हा बँकेसाठी ४ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे, याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रत्येक तालुक्यातून अर्ज दाखल करण्याचे आदेश नेत्यांनी यावेळी दिले. प्रत्येक तालुक्यांत निवडणुकीबाबतचे कार्यालय सुरू करून मतदारांशी संपर्क ठेवण्याचे आदेशही बैठकीत देण्यात आले.
उमेदवारी अर्ज भरण्याबाबतची जबाबदारी प्रा. जयंत पाटील व ए. वाय. पाटील यांच्यावर सोपविण्यात आली. बँकेच्या निवडणुकीत काँग्रेससोबत घेण्याची तयारीही नेत्यांनी दाखविली, पण युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर पुढे जाण्याची तयारी ठेवा, असा आदेशही नेत्यांनी दिला.
बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, माजी खासदार निवेदिता माने, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, बी. एन. पाटील-मुगळीकर, संजय पाटील-यड्रावकर, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, भैया माने, युवराज पाटील, नाविद मुश्रीफ, पी. जी. शिंदे, गणी फरास, प्रा. जयंत पाटील, अनिल साळोखे, चंद्रकांत बोंद्रे, आर. के. पोवार, सतीश पाटील, रणवीर गायकवाड, बाबूराव हजारे, अरुण इंगवले, मधुकर जांभळे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अशोकराव माने आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


‘केडीसीसी’त नवीन चेहऱ्यांना संधी
केडीसीसी बँकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पॅनेलमध्ये बहुतांशी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे संकेत यावेळी नेत्यांनी दिले. आगामी काळात बँकेचा कारभार फार जागरूकतेने करावा लागणार असल्याने काही अभ्यासू चेहऱ्यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे.


कार्यकर्त्यांशी केवळ चर्चा केली आहे, निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, ‘गोकुळ’बाबत ५ एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय घेतला जाईल.
- आमदार हसन मुश्रीफ


खासदार महाडिक यांची अनुपस्थिती
‘गोकुळ’ व ‘केडीसीसी’ बँकेबाबत राष्ट्रवादीची रविवारी महत्त्वाची बैठक असल्याने जिल्ह्यातील बहुतांशी नेते उपस्थित होते पण खासदार धनंजय महाडिक व आमदार संध्यादेवी कुपेकर अनुपस्थित होते.

बंद खोलीत नेत्यांशी
स्वतंत्र चर्चा
दोन्ही संस्थांच्या निवडणुकीबाबत तालुक्यात काय परिस्थिती आहे, याची चाचपणी आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. प्रमुख नेत्यांना स्वतंत्र खोलीत बोलावून मत जाणून घेतले.

Web Title: In the 'Gokul' alone, with the ruling group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.