‘गोकुळ’चा कारभार पुन्हा ‘आबाजीं’कडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:43 AM2018-10-01T00:43:05+5:302018-10-01T00:43:10+5:30
कोल्हापूर : ‘गोकुळ’ ची वार्षिक सभा संपल्याने नवीन अध्यक्ष निवडीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यासाठी संघातील ज्येष्ठ संचालकांनी फिल्डिंंग लावण्यास सुरुवात केली असली तरी आगामी विधानसभेचे राजकारण, संघाच्या दोन्ही नेत्यांशी असलेली जवळीकता पाहता विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील (आबाजी) यांच्याकडेच चौथ्या वर्षी कारभार राहण्याची शक्यता आहे.
कोणत्याही सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभा झाली, की नवीन अध्यक्ष, उपाध्यक्षाची चर्चा सुरू होते. ‘गोकुळ’मध्येही मागील दोन पंचवार्षिकमधील इतिहास पाहिला, तर प्रत्येक अध्यक्षाला दोन-दोन वर्षांची संधी दिली होती. ९७व्या घटना दुरुस्तीनंतर दरवर्षी न करता पाच वर्षांसाठी अध्यक्ष निवड करण्याची तरतूद आहे. ‘गोकुळ’च्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर विश्वास पाटील यांना अध्यक्ष म्हणून संधी दिली. गेले तीन वर्षे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत; त्यामुळे गेल्या वर्षीच अध्यक्ष बदलण्यासाठी काही संचालकांनी हालचाली सुरू केल्या होत्या; पण नेत्यांनी विश्वास पाटील यांच्यावर ‘विश्वास’ व्यक्त केला. गेल्या वर्षभरात विरोधक अधिक आक्रमक झाले. गाय दूध दर कपातीवरून विरोधकांनी मोर्चे काढले, त्यानंतरच्या काळात मल्टिस्टेटचा विषय आक्रमकपणे लावून धरला; पाटील यांनी विरोधकांना बऱ्यापैकी थोपवण्याचा प्रयत्न केला.
महाडिक, पी. एन. पाटील यांची पसंती शक्य
आता सभा झाल्याने पुन्हा अध्यक्ष निवडीची चर्चा जोर धरू लागली आहे, पाटील यांना तीन वर्षे झाल्याने उर्वरित दोन वर्षांत संधी मिळावी, यासाठी काही ज्येष्ठ संचालक प्रयत्नशील आहेत. त्यातूनच अरुण डोंगळे, रवींद्र आपटे, पी. डी. धुंदरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे; पण आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पी. एन. पाटील व महादेवराव महाडिक यांना उपयोगी ठरणाºया नावावर विचार होऊ शकतो. विश्वास पाटील हे पाटील यांच्या करवीर मतदारसंघातील आहेत, त्याचबरोबर ‘कुंभी’च्या राजकारणात ते आमदार चंद्रदीप नरके यांना कडवा विरोध करतात. त्याचबरोबर आमदार सतेज पाटील यांनाही त्यांनी अनेकवेळा अंगावर घेतल्याने ते महाडिक यांच्याही पसंतीस राहू शकतात; त्यामुळे पुन्हा विश्वास पाटील हेच ‘गोकुळ’चे कारभारी राहण्याची शक्यता आहे.